उशीर झाला तेव्हा कळले उशीर झालेला आहे

सवयीने मज प्राण वाटला 'बधीर झालेला आहे'
उशीर झाला तेव्हा कळले उशीर झालेला आहे


तिला वाटतो बहुरंगी मी विदुषक, वेडा, नर्तकही
आज म्हणाली पहा सख्यांनो फकीर झालेला आहे


द्वारपाल, संरक्षक, कुत्रा, सेवक, रंजक, भोईपण
कष्ट काढले मी अन  भलता वजीर झालेला आहे


रोज रोज आळीपाळीने सूर्यचंद्र येउन जाती
थट्टा माझी करण्या जो तो अधीर झालेला आहे


शत्रू झाले आहे पाणी नाहण्यास ती घेते ते
गुन्हेगार छेडतो तिला जो समीर झालेला आहे

गझल: 

प्रतिसाद

चमत्कारी,
ज्ञानेश यांना दिलेले आव्हान आपण घेतलेले दिसतेय. शेवटचा शेर समजला नाही.

सवयीने मज प्राण वाटला 'बधीर झालेला आहे'
उशीर झाला तेव्हा कळले उशीर झालेला आहे
कवीचा प्राण 'बधीर' होतो. या परिस्थितीची नेमकी कल्पना करता येत नाही. म्हणजे अति थंड प्रदेशात जशी म्हातारी माणसे कांबळी घेऊन एका कोपर्‍यात सकाळची बसून राहतात किंवा हॉस्पीटलमधे ऑपरेशन करण्याआधी जसे अंग बधीर करतात तसा कवीचा प्राण बधीर होतो. असे का होते हे सांगण्याची कवीला जरूर भासली नाही त्याअर्थी तसे कवीला का होते ते एकतर सर्वांना माहीत असावे, किंवा असे सर्वांनाच होते अशी कवीची कल्पना असावी किंवा सांगीतल्यानंतर कळेलच असे गृहीत धरण्यात आले असावे. मात्र उशीर झाला हे कवीला कसे कळले हे काही समजत नाही. म्हणजे बराच वेळ प्राणास 'बधीर' अवस्थेत बघून शंका आली म्हणुन जरा हलवून वगैरे पाहिले तेव्हा उशीर झाला हे कळले असावे.

तिला वाटतो बहुरंगी मी विदुषक, वेडा, नर्तकही
आज म्हणाली पहा सख्यांनो फकीर झालेला आहे
तिला काय वाटते याबद्दल कवीला आनंद होतो की दु:ख हे समजत नाही.

द्वारपाल, संरक्षक, कुत्रा, सेवक, रंजक, भोईपण
कष्ट काढले मी अन  भलता वजीर झालेला आहे
इथे एक पिढ्यानपिढ्यांची घुसमट आहे. आम्ही करायचे अन वेळेला भलत्यांचीच नावे असे काहीतरी. जर ऑर्डरमधे लिहिले आहे असे मानले तर द्वारपाल, संरक्षक, कुत्रा, सेवक, रंजक अन भोई या तिच्या प्रेमसंस्थेतील मिळालेल्या बढत्या मानाव्यात का मेमो मानावेत ते कळत नाही.मात्र एक नक्की, की भलताच कुणी वजीर झाला आहे यावरून कवीला राग आला आहे हे निश्चीत होते. अशा पद्धतीने जर एखाद्या पदाला पोहचून लोक वजीर किंवा राजा व्हायला लागले तर पंचाईतच होईल. जर वरील पदे मेमो असतील तर वजीर हे सर्वात निकृष्ट दर्जाचे पद असून तेच कवीला हवे होते असे मानण्यास कवीने वाव ठेवला आहे.

रोज रोज आळीपाळीने सूर्यचंद्र येउन जाती
थट्टा माझी करण्या जो तो अधीर झालेला आहे
भयंकर शेर! म्हणजे एकीकडे अख्खे जग म्हणते की सूर्य आहे म्हणुन सृष्टी चालतीय तिथे कवीला सूर्याच्या अपडाऊनमधे वेगळाच संशय येतोय. पण या शेरात एक आत्मविश्वास मात्र निश्चीतच वाखाणण्यासारखा आहे. ते म्हणजे जो येतो तो माझी थट्टा करायला येतो.

शत्रू झाले आहे पाणी नाहण्यास ती घेते ते
गुन्हेगार छेडतो तिला जो समीर झालेला आहे
अशा कल्पना यापुर्वी आम्ही तरी वाचलेल्या नव्हत्या. ती नहायला जे पाणी घेते ते पाणी कवीचे शत्रू आहे. म्हणजे कवी कुठल्या मनस्थितीत आहे याची कल्पना करता येते. तिच्याशी संबंधित कुठलीही गोष्ट ( अर्थातच स्वत:शिवाय ) कवीला शत्रू वाटते. दुसर्‍या ओळीत कोण काय झाले आहे तेच कळत नाही. म्हणजे हा जो कुणी समीर आहे तो गुन्हेगार झालाय का गुन्हेगार आहे तो समीर झाला आहे असा एक प्रश्न निर्मान होतो. समीर हा शब्द वारा या अर्थाने वापरला असेल तर समजा वार्‍याने तिला छेडलेच तर कवी करणार काय? नुसते बघतच बसावे लागेल.
एकंदर गझल नापास व बरी यांच्या सीमारेषेवर आहे.
कुणीतरी कुणालातरी दिलेले आव्हान मधेच कवीने उचलल्यामुळे व उत्साहात गझल केल्याबद्द्ल १०० पैकी ३५ 

काका...
माफ करा..
पण गझल नावाप्रमाणेच चमत्कारीक .....
हर एक शेर..Bouncer गेला...

चमत्क्कारी बाबाची
गझल आवडली...
मात्र — गंभीर समीक्षक  आपली मते पटत नाहीत.. कधाचित तो अर्थ आपण लावत असावा..
रोज रोज आळीपाळीने सूर्यचंद्र येउन जाती
थट्टा माझी करण्या जो तो अधीर झालेला आहे


भयंकर शेर! म्हणजे एकीकडे अख्खे जग म्हणते की सूर्य आहे म्हणुन सृष्टी चालतीय तिथे कवीला सूर्याच्या अपडाऊनमधे वेगळाच संशय येतोय. पण या शेरात एक आत्मविश्वास मात्र निश्चीतच वाखाणण्यासारखा आहे. ते म्हणजे जो येतो तो माझी थट्टा करायला येतो.

प्रिय मित्र भूषण,
शेवटचा शेर कळला नसला तरी हरकत नाही. ८० % कळणे सुद्धा बरेच आहे असे मी मानतो.
प्रिय मित्र दशरथ,
धन्यवाद!
समीक्षक,
आपल्याला इतका वेळ कसा असतो?
चांदणीताई,
शेर बाउन्सर गेले वाचून खूप हसलो.
चमत्कारी

रोज रोज आळीपाळीने सूर्यचंद्र येउन जाती
थट्टा माझी करण्या जो तो अधीर झालेला आहे
छान शेर.