अहं ब्रह्मास्मि

पाहिले अंती जगाच्या काय मी ही साधले..
सूक्ष्म झालो मीच आणिक मी जगाला व्यापले


कृष्ण होतो गोकुळी अन् राम होतो दशरथी
कंस - रावण मीच होवुन मीच मजला मारले


बोधिसत्वाच्या रुपाने धम्मतत्वा मांडण्या..
त्यागुनी प्रासाद-गोष्टी मीच मजला त्यागले


प्रलयकारी होवुनी उद्दाम होतो मी जरी...
नाव तारूनी मनूची मीच मजला तारले


इंद्र म्हणुनी कृद्ध होता वरुणरूपे बरसलो -
आणि गोवर्धनस्वरूपी मीच मजला उचलले


मीच तो नरसिंह झालो पोट माझे फाडण्या
पाय ठेवूनी शिरावर मीच मजला गाडले


काव्य स्फुरता सर्वव्यापी गझल होवुन राहिलो
अन् समीक्षा होत तत्पर मी मला धिक्कारले


 


(१ प्रयत्न)

गझल: 

प्रतिसाद

श्री अजय,
याला आपण प्रयत्न का म्हणत आहात समजत नाही. चांगली रचना आहे.   मतला तर सुरेखच आहे. खरोखर कधी कधी तसे हे वाटते हे खरे. मात्र खालील ओळी मला तांत्रिक दृष्ट्या गडबडीच्या वाटत आहेत. त्यावर अर्थातच आपण स्वतः किंवा इतर जाणकार सांगतीलच.
 
प्रलयकारी होवुनी उद्दाम होतो मी जरी...
नाव तारूनी मनूची मीच मजला तारले ( तारुनी मधे रू दीर्घ घ्यावा लागत आहे )

इंद्र म्हणुनी कृद्ध होता वरुणरूपे बरसलो -
आणि गोवर्धनस्वरूपी मीच मजला उचलले ( याच्यात उचलले हा शब्द मला पटला नाही. बाराखडीप्रमाणे तो बसणार हे मला ज्ञात आहे. परंतू साधले, तारले नंतर उचलले पटत नाही. 'धारले' पटेल असे वाटतेय. )
बाकी गैरसमज नसावेत. मला ही रचना आवडली.
धन्यवाद!

'धारले' हे योग्य वाटत नाही. धारण करणे आणि उचलणे यात फरक आहे. श्रीकृष्णाने मोरपीस धारण केले आणि गोवर्धन उचलला.

'तारूनी' मध्ये रू दीर्घ घ्यावा लागत आहे? .... नाही, घेतलाच आहे.
प्रयत्न एवढ्यासाठी म्हटले की, असे विषय गझल म्हणून हाताळता येतात का हे मला माहित नाही. पण मी तसे करण्याचे ठरविले म्हणून प्रयत्न.
कलोअ चूभूद्याघ्या

सुरेख रचना आहे.  गीतेत सांगितल्याप्रमाणे कारण ही मीच आणि परिणाम ही मीच.

अजय,
वेगळा विषय. गझल आणि अध्यात्माचा संगम झाल्यासारखे वाटते. 

निळ्या अक्षरातील नवीन प्रयत्न.
विनोद : पुलंच्या रावसाहेबांनी मला स्वप्नात येवून विचारले, "जोशी, तेवढे कारले बसते का बघा हो?"
कुणाला या संकल्पनेत जमले तर पहा...
तसे मी धिक्कारलेमधे प्रयत्न केला आहे म्हणा.
प्रतिसाद दिलेले न दिलेले सर्वांना धन्यवाद.
कलोअ चूभूद्याघ्या

एक कंसेप्ट म्हणून/ वेगळेपणा म्हणून गझल आवडली, मात्र असे विषय गझलेत असतात/असावेत  का हे जाणकारच सांगू शकतील.
समीक्षेचा  शेर आवडला.
दोन शेर माझेही-
"मी  कधी  झालो  तुका,  नाठाळ  माथी  फोडली..
होत  मंबाजी  कधीसे, मी  मलाही  हाणले..."
आणि  रावसाहेबांचा  मान  राखून-
"मी  कधी  माझ्याच  पेकाटात  लाथा  घातल्या,
अन् कधी  हाडूक देवून मी  मला  चुचकारले.."

पाहिले अंती जगाच्या काय मी ही साधले..
सूक्ष्म झालो मीच आणिक मी जगाला व्यापले
गझल आणि अध्यात्म हे विषय तसे  जवळचे. ईश्वरावर प्रेम करणे ( तेही निर्गुण निराकार ) सहज नसे म्हणून उर्दू शायरांनी आपल्या गझलांमधे प्रेयसीवर प्रेम केल्याचे अनेक दाखले आहेत. त्या माध्यमातून ईश्वरापर्यंत पोहोचणे अशी ती संकल्पना होती.
गालिबचा शेरः खुदाके वास्ते पर्दा न काबेसे उठा जाहिद
                          कही ऐसा न हो यों भी वही काफिर सनम निकले
मोमीनचा शेर : तुम मेरे पास होते हो गोया...जब कोई दुसरा नही होता..
ही त्यावरील थोडीशी साधर्म्य असणारी उदाहरणे.
 कवीला अशी जाणीव झालेली आहे की सर्वात सूक्ष्म गोष्ट काय किंवा सर्वव्यापी शक्ती काय, माझीच रुपे आहेत. मी अन ती वेगळे नाहीच. ध्यानातून असे विचार निर्माण होतात. वास्तविक पाहता ही मनाची एक अवस्था असली तरी ती अध्यात्माशी संबंधित असल्यामुळे नेमकी गझल वाटत नाही.


कृष्ण होतो गोकुळी अन् राम होतो दशरथी
कंस - रावण मीच होउन मीच मजला मारले
मतल्यातील विचार दुसर्‍या शेरात सोदाहरण सांगितले आहेत. नुसताच हा शेर वाचला तरी त्याचा अर्थ लागतो आणि तो अर्थ दिलचस्पपण वाटतो. त्यामुळे गझलेचा एक महत्वाचा नियम या शेरात पाळला गेला आहे की शेर स्वतंत्र चालतात. दशरथी हा शब्द मात्र चुकला आहे. दशरथ हे काही एखाद्या गावाचे नाव नाही. 'राम दाशरथी असे' अशी ओळ केल्यास किंवा 'मी अयोध्यापुत्र ही' असे म्हंटल्यास योग्य व्हावे. या शेरामधे 'लॉ ऑफ काँझर्व्हेशन ऑफ मास, किंवा एनर्जी' यातील विचार मांडला गेला आहे. आत्मे हेच कधी देवस्वरूप असतात तर कधी असूरस्वरूप. फक्त स्वरुप बदलते. सारे एकच आहेत. मात्र ही मनाची अवस्था म्हणता येणार नाही. यात फक्त अनुभुती असू शकते.  असे म्हणायचे असावे की, मला ध्यानातून किंवा तपश्चर्येतून असे ज्ञान प्राप्त झाले की सारे एकच आहेत.
पण आशय व मांडणी गझलेला पूरक वाटेल अशी नाही.  


बोधिसत्वाच्या रुपाने धम्मतत्वा मांडण्या..
त्यागुनी प्रासाद-गोष्टी मीच मजला त्यागले
पुनरावृत्ती. या रचनेचा एक वेगळाच भाग आता विचारात घ्यावासा वाटत आहे. गझलेतील प्रत्येक शेर स्वतंत्र  असू शकतो  असे मानले आणि या गझलेतील वरील तीन शेर वाचले तर ते स्वतंत्र अजिबात नाहीत. आम्ही फक्त आशयाच्या दृष्टीकोनातून म्हणत आहोत. तसा प्रत्येक शेर स्वतंत्र आहे. पण तिन्ही शेरातून एकच मुद्दा सांगण्यात आला आहे. गझल या काव्यप्रकाराचा मुळ फायदाच घेतला गेलेला नाही. तीन शेरातून तीन वेगळ्या गोष्टी सांगणे शक्य असताना असे का केले समजत नाही.


प्रलयकारी होवुनी उद्दाम होतो मी जरी...
नाव तारूनी मनूची मीच मजला तारले  

इंद्र म्हणुनी कृद्ध होता वरुणरूपे बरसलो -
आणि गोवर्धनस्वरूपी मीच मजला उचलले

मीच तो नरसिंह झालो पोट माझे फाडण्या
पाय ठेवूनी शिरावर मीच मजला गाडले

हे सर्व शेर तसेच आहेत.


काव्य स्फुरता सर्वव्यापी गझल होवुन राहिलो
अन् समीक्षा होत तत्पर मी मला धिक्कारले
इथे 'समीक्षा' हा कर्ता असू शकत नाही. 'समीक्षक' असा शब्द घ्यायला पाहिजे असे वाटते. तो बसेलही. हा एकच शेर असा आहे ज्याच्यात मुद्दा तोच असला तरी उदाहरण भिन्न वापरले आहे. काव्य क्षेत्रावर हा शेर रचला गेला आहे. इथे समीक्षक 'धिक्कारतातच' असा एक सार्वत्रिक गैरसमज आणखीन दृढ केला गेला आहे. समीक्षेबद्दलची आमची मते:
१. त्याने कवीच्या प्रतिभेमधे अथवा कवितेमधे कुठलाही मूलभूत फरक पडू शकत नाही कारण जन्मजात जे असते त्यापेक्षा माणूस खूप काही वेगळे करू शकत नाही. काही सुधारणा निश्चित होतात. काव्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर तंत्र, सहजता, गोडवा, विषयांचे वैविध्य, खोली या गोष्टी सुधारू शकतात. पण जे कवीच्या मनात नैसर्गिकरीत्या येते त्याच्यावर समीक्षेचे नियंत्रण असू शकत नाही.
२. समीक्षकांनी उचलून धरल्यामुळे कुठल्याही कवीला राजाश्रय मिळण्याचे हे दिवस नाहीत.
३. जी कविता रसिकांना बेहद्द आवडते ती समीक्षकांना आवडो न आवडो त्याने काहीही फरक पडत नाही.
४. समीक्षेमुळे समाजाची अभिरुची सुधारण्यास जरूर मदत होऊ शकते. म्हणजे आपल्याला मुळात काय आवडले पाहिजे याच्या संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होते. या साईटवरील बहुतांशी कवींना किंवा वाचकांना त्याची आवश्यकता भासणार नाही. कारण मुळात जे गझलसारखा काव्यप्रकार हाताळतात किंवा त्याचे रसग्रहण करतात त्यांना या गोष्टी बहुतेकवेळा ज्ञात असतातच. मात्र त्यातही काही त्रुटी असू शकतात. त्यातही ढोबळ चुका होऊ शकतात. त्यांची चर्चा आवश्यक आहे.
५. समीक्षेमुळे पूर्वी कसे जनजीवन होते, कसे संदर्भ कसे होते याचे वाचकांना ज्ञान होते. एखादे काव्य समजायला अवघड गेले तरी समीक्षेने ते सुलभ होते. समीक्षेचे सर्वात मोठ्ठे काम म्हणजे स्वतःच्या माध्यमातून संस्कृती व तिची मूल्ये टिकवण्याचा प्रयत्न करणे.  त्यासाठी समीक्षा खूप सखोल विचारांची असायला पाहिजे. आम्ही करतो तशी असून उपयोग नाही.
आता काव्य या विषयाबाबतीत माणसांच्या बुद्धिमत्तेबाबतच्या रचना:
१. सर्वात कमी दर्जाचा असतो तो, ज्याला कविता अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही, उलट तिचा तिरस्कार असतो. ( या रचना फक्त कवितेसंदर्भात आहेत. इतर क्षेत्रात हीच माणसे अत्यंत बुद्धिमान व श्रेष्ठ असू शकतील )
२. रसिक
३. खोटे कवी ( जे कवी नाहीयेत पण कवी म्हणवून घेण्यात धन्यता मानतात )
४. खरे पण किरकोळ कवी
५. समीक्षक
६. श्रेष्ठ कवी व श्रेष्ठ समीक्षक.
७. सौंदर्यशास्त्र ( हे ठरवते की समीक्षा योग्यपणे केली की नाही? )
८. तत्त्वज्ञान - हे ठरवते की सौंदर्यशात्राचे एखाद्या समाजातील नियम सर्वसमावेशक आहेत की नाही. ( या पातळीवर काही संतकवी होऊन गेले आहेत )
९. अध्यात्म - अध्यात्माच्यावरचे मानवाला काहीही ज्ञात नाही. अध्यात्माच्या द्रुष्टीकोनातून हे बघितले जाते की एखाद्या संस्कृतीचे तत्वज्ञान योग्य आहे किंवा नाही. महान कवी संत ज्ञानेश्वर या पातळीवर होते.
हे आपले आम्हाला माहीत असलेले विचार. कुणाला काही म्हणायचे असल्यास जरूर म्हणावे. आमचे काही चुकले असेल तर चूक कबूल करू.
ही गझल अध्यात्माशी निगडीत आहे परंतू गझलेच्या काही 'प्रवृत्तीसंबंधित' नियमांना सोडुन चालते. त्यामुळे आशय, शब्दरचना व वृत्त या निकषांवर चांगली!
१०० पैकी ५५

इथे 'समीक्षा' हा कर्ता असू शकत नाही. 'समीक्षक' असा शब्द घ्यायला पाहिजे असे वाटते.
काव्य स्फुरता सर्वव्यापी गझल होवुन राहिलो
अन् समीक्षा होत तत्पर मी मला धिक्कारले
या ओळींमध्ये समीक्षा हा कर्ता नाही. "आणि तत्परतेने समीक्षक मीच होवुन, त्याची समीक्षा मीच होवुन, मीच माझा धिक्कार केला." असे आहे. समीक्षेने धिक्कारले असे नाही तर समीक्षकाने समीक्षेच्या सहाय्याने धिक्कारले. असो.
पण तिन्ही शेरातून एकच मुद्दा सांगण्यात आला आहे.
कित्येक गझल (स्तुती झालेल्याही) अशाच आहेत. तिन्ही नाही तर सर्व शेरांतून एकच मुद्दा (अहं ब्रह्मास्मि) आलेला आहे.
ती पूर्णपणे अध्यात्माशी संबंधित असल्यामुळे नेमकी गझल वाटत नाही.
हे विधान जरा विचित्रच आहे. याबाबत मी काही दिवसांनंतर सांगेन.
सध्या रजा.
कलोअ चूभूद्याघ्या