गुपितपक्का मी शेंदाड शिपाई! कधीतरी पण घडते काही 
बाहुंमध्ये आणि जरासे; जरासेच फुरफुरते काही

कुणास कळतो सर्व पसारा? तरी शहाणा त्यास म्हणावे -
ज्याला कळते - सगळे त्याच्या कळण्यासाठी नसते काही

लिहीत नाही जेव्हा माझे चार दिवस ते सुखात जाती
हाय पुन्हा मग दिसते काही, स्मरते काही... सुचते काही!

रोज साजर्‍या करतो माझ्या मनातल्या या क्षणिक दिवाळ्या
अंधारावर जळते, क्षणभर लखलखते अन... विझते काही!

मरणाची कोणाला चिंता? गुपित समजले अमरपणाचे
जगले जे नाहीच मुळी ते सांग कधी का मरते काही!गझल: 

प्रतिसाद

पक्का मी शेंदाड शिपाई! कधीतरी पण घडते काही 
बाहूंमध्ये आणि जरासे; जरासेच फुरफुरते काही
छान !
लिहीत नाही जेव्हा माझे चार दिवस ते सुखात जाती
हाय पुन्हा मग दिसते काही, स्मरते काही... सुचते काही!

सुंदर !
रोज साजर्‍या करतो माझ्या मनातल्या या क्षणिक दिवाळ्या
अंधारावर जळते, क्षणभर लखलखते अन... विझते काही!
वा... वा !

शुभेच्छा... !

पुलस्ति,
आपल्या या गझलेती एक एक शेर अप्रतिम आहे. अगदी म्हणजे अगदीच भावले.

अप्रतिम गझल आहे. सगळेच शेर भावले.
विशेषतः-

लिहीत नाही जेव्हा माझे चार दिवस ते सुखात जाती
हाय पुन्हा मग दिसते काही, स्मरते काही... सुचते काही!
   व्वा!
अस्सल  कवीपणाचे  लक्षण  आहे  हे!
 
याच शेरावरून मला माझ्या (अप्रकाशित!) गझलेतला एक शेर आठवला, विशेष म्हणजे  'काही' हाच रदीफ आहे-
"लिहून टाका खुशाल जे जे सुचेल ते ते,
पडेल काही.. रुजेल काही.. जगेल काही..."

पडेल काही, जगेल काही, रुचेल काही! अप्रतिम ओळ आहे.
ही गझल पण प्रकाशित व्हावी अशी इच्छा व्यक्त करतो.

पक्का मी शेंदाड शिपाई! कधीतरी पण घडते काही 
बाहुंमध्ये आणि जरासे; जरासेच फुरफुरते काही

मतल्यातच कवी प्रांजळ स्वभावाचा असल्याचे निदर्शनास येते. इथे कधीतरी काय घडते यावर वेगवेगळी मते असू शकतील. काफिया किती सैल असावा यावरही प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतील.फुरफुरणे हा शब्द यापुर्वी अश्वस्वरुपांच्या सजीवांसंदर्भात ऐकला होता. अश्व हा एक उभयचर प्राणी असून तो उत्साहात आला की फुरफुरतो. 'आणि', 'जरासे' अन 'जरासेच' या सर्व शब्दांना बसवण्यामागे 'वृत्ताची गरज', 'जास्त वेळ विचार करण्याचा नेमका त्याचवेळी आलेला कंटाळा' व 'शेंदाडपणाला जास्त फुरफुरणे शोभणार नाही हा अंदाज' अशा तीन गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत आहेत. 
मुळात हे सर्व का होते ते पाहिले पाहिजे. परिस्थिती हातात आली की माणसाचे शौर्य जागे होते. म्हणजे पिंजर्‍यातल्या वाघाला वाकुल्या दाखवता येतात. पण वाघ चुकून बाहेर आला तर वाकुल्या दाखवण्याची फारशी आकांक्षा रहात नाही. त्यामुळे हे जे जरासे अन जरासेच फुरफुरल्यासारखे होते ते बहुधा अधुनमधून परिस्थिती हातात येत असल्याचे निदर्शक आहे.

कुणास कळतो सर्व पसारा? तरी शहाणा त्यास म्हणावे -
ज्याला कळते - सगळे त्याच्या कळण्यासाठी नसते काही

मधील रेघा महत्वाच्या आहेत. ते एका सरळ विधानाला पद्यात्मक कपडे घालतात. सगळे कुठे कुणाला कळते पण ज्याला कळते त्याच्या कळण्यासाठी सगळे नसते किंवा ज्याला हे  कळते की सगळे त्याला समजलेच पाहिजे असे नाही तो शहाणा असे काहीतरी ते विधान आहे. ह्या विधानावरून असे वाटते की निराशा ( आपले काहीजणांना कळत नाही ते त्या काहीजणांच्या आकलनशक्तीमुळे की आपल्या अभिव्यक्तीमुळे याचा नेमका अंदाज न आल्यामुळे आलेली निराशा ) , असे अनुभव व्यक्त करायचे असणे जे पूर्णपणे इतरांना न कळणेच एकंदर सोयीचे ठरेल यामुळे किंवा गझल हे अंदाधुंदी माजलेले क्षेत्र आहे याबद्दल खात्री पटल्यामुळे काहीही लिहिलेले चालेल अशा दृढ विश्वासामुळे या विधानाची निर्मिती झाली असावी.

लिहीत नाही जेव्हा माझे चार दिवस ते सुखात जाती
हाय पुन्हा मग दिसते काही, स्मरते काही... सुचते काही!

परत एकदा प्रचंड प्रांजळपणा! मी लिहीत नाही तेव्हा मुळात माझेच ४ दिवस सुखात जातात. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जाहीर केलेल्या रचनेस वाचून किंवा ऐकून इतरांना काय होईल हा मुद्दाच फार दूर आहे. आधी रचना न सुचल्यामुळे कवी स्वतःच सुखात आहे. एक अत्यंत अंतर्मुख करणारा विचार समाजापुढे येतो या शेरातून. म्हणजे या कवीच्या रचना ( सार्वजनिक ठिकाणी जाहीर झालेल्या ) या सर्व कवीला स्वतःलाच दु:खी करतात. बाकीच्यांचे काय होते ते त्यांचे त्यांनी ठरवावे. काहीजणांना वरकरणी अशी मनस्थिती अँटी-गझल वाटण्याची शक्यता आहे. पण ते तसे नाही. आपल्याला कविता सुचली याचे ह्या कवीला अपार दु:ख आहे; पण इतरांना कविता सुचताना तसे होईलच असे काही नाही. आता चांगला सुखात असताना मधेच कविता सुचतेच कामुळात? या प्रश्नाचे कवी उत्तर असे देतो की त्याला काहीतरी दिसते, स्मरते अन सुचते. हिंदी चित्रपटात स्मृतीभ्रंश झालेल्यांना त्यांच्या त्या धक्कादायक परिस्थितीची आठवण करून दिल्यास ते पूर्ववत होत. हेही तसेच काहीतरी असावे.फक्त ते सुधारत व त्यामुळे इतर सुखी होत, इथे तसे झाले की कवी दु:खी होतो अन इतरांचे काय होते ते अजून पेपर आउट झालेले नाही.

रोज साजर्‍या करतो माझ्या मनातल्या या क्षणिक दिवाळ्या
अंधारावर जळते, क्षणभर लखलखते अन... विझते काही!

व्वा! सुंदर शेर आहे. अत्यंत छानपणे मनस्थिती उद्धॄत केली आहे.

मरणाची कोणाला चिंता? गुपित समजले अमरपणाचे
जगले जे नाहीच मुळी ते सांग कधी का मरते काही!

हिंदोळे, हेलकावे वगैरे शब्दांचे अर्थ सहज कळतात या गझलेतील विविध शेर वाचले की. सुरपारंब्या खेळताना कसा एखादा लहान मुलगा हवेत जातो अन पुन्हा मोमेंटम मधे खाली येतो तसे. कधी काहीतरी सुचते अन दु:खी होतो, कधी सगळेच एखाद्याला कळण्यासारखे नसते, कधी क्षणिक दिवाळ्या तर कधी जगलोच नाही तर मरणार कसा? सर्व शेर स्वतंत्र असतातच. तेव्हा ते किती स्वतंत्र असावेत ते ज्याचे त्याने ठरवावे.

एकंदर गझल उत्तमः

१०० पैकी ५८

सारेच शेर अप्रतिम.

मरणाची कोणाला चिंता? गुपित समजले अमरपणाचे
जगले जे नाहीच मुळी ते सांग कधी का मरते काही!
कलोअ चूभूद्याघ्या

अतिशय उत्कृष्ट गझल आहे. पूर्णपणे मनोव्यापारांवर आधारित. अभिनंदन प्रिय मित्र पुलस्ति!

गझल आवडली..त्यातही हे शेर जबरदस्त.

लिहीत नाही जेव्हा माझे चार दिवस ते सुखात जाती
हाय पुन्हा मग दिसते काही, स्मरते काही... सुचते काही!

रोज साजर्‍या करतो माझ्या मनातल्या या क्षणिक दिवाळ्या
अंधारावर जळते, क्षणभर लखलखते अन... विझते काही!