आपुलिया बळें -२

- आणि ज्या प्रकारे व ज्या वातावरणात मी लहानाचा मोठा झालो, त्याचा विचार
करता मी आज असे म्हणू शकतो की माझ्याजवळ आपोआप गझल आली. गझलेसारखी गझल! मी
इतर काव्यप्रकार उपेक्षणीय समजत नाही. मी नेहमीच्या काव्यरचना तुच्छ समजत
नाही. याही काव्यसंग्रहात गझल नसलेल्या माझ्या अनेक काव्यरचना आहेत.
ज्याला जे जमेल, ते त्याने करावे. कोणताही काव्यप्रकार हाताळावा. मी
प्रत्येक काव्यप्रकार सुंदरच समजतो. हव्या त्या फुलाचा सुगंध घ्यावा!
मी गझलेच्या प्रेमात पडलो, म्हणून मी गेली किमान अडतीस वर्षे मराठी भाषेत गझल लिहीत आहे, असेही नाही. मी
माझ्या महाराष्ट्रावर आणि माझ्या मायबोलीवर-मराठीवर अक्षरशः प्रेम करतो,
म्हणून मी बाकी सारे मोह टाळून उभे आयुष्य मराठी गझल लिहिण्यासाठी जाळले. या
प्रदीर्घ कालखंडात मराठी गझलेच्या वाट्याला किती खिल्ली, किती उपेक्षा आणि
किती विरोध आला, याची कुणासही कल्पना नाही. चुणूक म्हणून समीक्षेचा मासला:
भटांचा भटारखाना!
पण आज मराठी गझल म्हणजे मराठी काव्यातील एक शक्तिशाली वस्तुस्थिती आहे, हे सत्य कुणालाही नाकारता येणार नाही.
मराठी माणसांनी- विशेषतः,तरुण पिढीने मराठी गझलेचा संपूर्ण स्वीकार केलेला
आहे. येथे' स्वीकार' हा शब्द फार महत्त्वाचा. सोयीनुसार, परवडते म्हणून
किंवा 'करियर'साठी गझल लिहायची नसते. गझलच कशाला, कोणताही काव्यप्रकार
हाताळायचा नसतो! जे 'करियर'साठी गझलेकडे वळले, त्यांची हालत ' न इधर के रहे, न उधरके रहे!' अशी झालेली आहे. केवळ गझलेच्या फॉर्ममध्ये लेखन केले, म्हणूनही ती गझल ठरत नसते.'फॉर्म' सांभाळून केलेल्या निर्जीव लेखनाला 'गझल' म्हणत नसतात.अशी तथाकथित गझल कोणताही परिणाम करीत नसते, आणि ज्याची थांबण्याची तयारी नाही, त्याने गझलेच्या वाटेला जाऊ नये!
खरे
तर ज्याच्यात मुळातच दम नसतो, अशा कवीचा कोणताही काव्यप्रकार अपयशीच ठरतो.
मग लिहिणारा कुणीही असो. मी कवितेच्या यशाची एक व्याख्या केलेली आहे: जी वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर रसिकाच्या कायम स्मरणात राहते, जिचा नेहमीचा जनजीवनात प्रत्यय येतो, ती यशस्वी कविता!
कुणीही
फक्त स्वतःसाठीच कविता करीत नसतो. कारण कविता हा संवाद आहे. अगदी
व्यक्तिगत स्वरूपाची कविता वाटत असली, तरी वाचणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला
तिच्यात स्वतःच्या जीवनाचे प्रत्यय येत असतात.' अरे हा तर माझाच मनातले
बोलतोय! अरे, असेच घडले की, माझ्या बाबतीत!' असे रसिक म्हणत असतो.
प्रचितीचे बोलणे म्हणजे कविता.
पण
जी मराठी माणसाला जाणवत नाही, ती कविता काय? जी नित्यनेमाने पाडली जाते,
ती कविता काय? केवळ शब्दांची हगवण म्हणजे कविता काय? किंवा महापुरुषांच्या
पवित्र नावांच्या संगिनी छातीवर रोखून आपली कविता महान आहे, असे
जुलूम-जबरदस्तीने सर्टिफिकेट मिळवले, म्हणून संबंधीत कवी महान ठरतो काय?
जो शिल्लक राहतो, तोच मोठा! तेथे जात आणि धर्म उपयोगी पडत नाही. तेथे
ग्रामीण किंवा शहरी, असा अभिनिवेश कमी पडत नाही. तेथे कळप कामाचे नसतात. सत्य, साधेपणा आणि माणुसकी हीच कवितेची खरी शक्ती असते- मग ते सत्य वैयक्तिक असो किंवा सामाजिक असो.
ज्याला सोपे लिहिता येत नाही, तो कवी नसतो. कारण ज्याच्यात धमक नसते, तोच
दुबळा व भित्रा इसम साधा उंदीर मारण्यासाठी ऍटम बॉम्बचा उपयोग करतो. एक
साधी गोष्ट सांगण्यासाठी अगडबंब शब्द कशाला हवेत? तर ते असो.
 मला
कवितेच्या बाबतीत जे वाटते, ते मी येथे लिहिलेले आहे. माझी भूमिका रसिक
वाचकांनी समजून घ्यावी, म्हणून मी हा प्रयत्न केलेला आहे. बाकी कोणताही
अभिनिवेश नाही. माझ्या मर्यादा मला ठाऊक आहेत.
                                     हम कहाँ के दाना थे? किस हुनर में यक़ता थे?
                                     मुफ़्त ही हुआ, 'ग़ालिब' दुश्मन आसमाँ अपना!
- मी कुठे बुद्धिवान होतो? मी कोणत्या कलेत एकमेव होतो? अरे 'गालिब', दैवाने माझ्याशी उगीचच वैर धरले!