रेंगाळणे


पुन्हा त्याच दृष्यांवरी भाळणे
पुन्हा त्याच  रस्त्यात रेंगाळणे

जशी फाटते तप्त धरणी तसे
तुझे आतल्या आत भेगाळणे

कशाला कुणाची हवी सांत्वना
मला तू, तुला मीच सांभाळणे

धृवा सांगते खूप काही मला
तुझे एकट्यानेच तेजाळणे


कुणाच्या वधाची असे बातमी
नभाचे असे रोज रक्ताळणे *


 


अनंत ढवळे

( पानगळीतून..   * मीर च्या  गोर किस दिलजले की है ये फलक / शोला इक सूबहु यां से उठता है  या शेरावरून प्रेरित )





गझल: 

प्रतिसाद

अनंतजी, धन्य  केलेत.  'काल रात्रभर तुझी वेदना जळत राहिली..' या  गझलेची  आठवण झाली.
जशी फाटते तप्त धरणी तसे
तुझे आतल्या आत भेगाळणे... आह! क्या बात है!!

कशाला कुणाची हवी सांत्वना
मला तू, तुला मीच सांभाळणे.. सुंदर.

धृवा सांगते खूप काही मला
तुझे एकट्यानेच तेजाळणे.. दण्डवत.
धन्यवाद!

बैठने कौन दे है फिर उसको
जो तेरे आस्ताँसे उठता है
देख तो दिल के जाँसे उठता है.....ये धुवाँसा कहाँसे उठता है
मीर तकी मीर यांच्या ही अत्यंत लोकप्रिय गझल. तिच्यापासून स्फुर्ती घेऊन वरील गझल रचली आहे. हे विधान अत्यंत प्रामाणिक तर आहेच पण त्याचवेळेस उगीचच त्याच शेरांचा अनुवाद वगैरे न करता किंवा त्याच विषयांच्या धर्तीवर शेर न रचता स्वतःची अशी एक अत्यंत सुंदर रचना केली आहे. खरे तर प्रेरणेचा उल्लेख केला नसता तरी ही रचना श्रेष्ठ वाटलीच असती.
धृवा सांगते खूप काही मला...तुझे एकट्यानेच तेजाळणे...सुंदर!
ही गझल आहे.

ढवळेसाहेब,
अप्रतिम गझल. मान गये. भेगाळणे आणि सांभाळणे फारच सुंदर शेर आहेत.
(रक्ताळणे नाही समजला, पण वाचायला आवडला. )
शुभेच्छा व धन्यवाद!

पुन्हा त्याच दृष्यांवरी भाळणे
पुन्हा त्याच  रस्त्यात रेंगाळणे
वा! एक मनस्थिती,  ज्यात कवी तोचतोचपणा व्यक्त करत आहे. जीवनात आशा नवनवे मार्ग असल्यासारख्या थाटात रस्ते दाखवतात. त्या दिशेने गेल्यावर कळते, हे सगळे तेच आहे.  पण आशेला उपाय नाही. मन आहे तोवर आशा आहे. तोपर्यंत तेच तेच मोह होत राहणारच. तसेच जीवन काहीही वेगळे देत नाहीये, असा एक विचार यातून व्यक्त होतो. छान शेर!

जशी फाटते तप्त धरणी तसे
तुझे आतल्या आत भेगाळणे
स्वगत या दृष्टीकोनातून या शेराकडे पहावे. इथे आतल्याआत जखमा होणे किंवा मनाला भेगा पडणे याची तुलना धरणीच्या फाटण्याशी केली आहे. या शेरातील सर्वात महत्वाचा शब्द आहे 'आतल्याआत'. तू जर ज्वालामुखीसारखा तप्त होऊन सांडलास ( हवे तसे बंडखोरी करत वागत राहिलास ) तर हवेच आहे. पण तसे तू करू शकत नाहीस. कारण तू आहेस एक संवेदनाशील, मृदू अन नाजूक मनाचा कवी. तुला येणाया अनुभवांमुळे, जगाच्या निर्दयतेमुळे तुझ्या मनात अगदी क्वालामुखी निर्माण झाला तरी तो फार तर तुलाच आतल्याआत भेगा पाडणार. तुझ्याकडुन अन्यायाच्या विरोधात वागणे होणारच नाही. छान शेर!

कशाला कुणाची हवी सांत्वना
मला तू, तुला मीच सांभाळणे
इथे स्वगतही समजावे अन प्रियेशी केलेला संवादही!  पण स्वगतच जास्त! जगाने मान्य केले नाही, असे आपले प्रेम! सगळे जगच आपल्या विरोधात! अशा वेळेस तुझी मी अन माझे तूच सांत्वन करायचे. हे विधान झाले कवी जर प्रेयसीला सांगतोय असे गृहीत धरले तर! पण कवी स्वतःलाच सांगतोय असे गृहीत धरले तर फारच उंचीचा शेर!

धृवा सांगते खूप काही मला
तुझे एकट्यानेच तेजाळणे
चुकलेला शेर! संकेत, म्हणी, वाक्प्रचार यांचा गझलेत वापर करणे हे पुर्वी उच्चदर्जाचे समजले जायचे. उदाहरणार्थः प्रेयसीच्या वचनांना 'बोलाचीच कढी बोलाचाच भात' वगैरे म्हणणे! इथे 'धृवतारा' अढळपदी आहे अन त्यामागे त्याची तपश्चर्या आहे या कथेचा वापर करण्यात आलेला आहे. पण धृवतार्‍याचे वैशिष्ट्य त्याचे तेजाळणे किंवा एकट्याने तेजाळणे नसून त्याचे अशी जागा प्राप्त करणे आहे जिथे त्याला कुणीही 'जा' म्हणणार नाही. एकटे तेजाळण्याचे काम सगळेच तारे करतात. सूर्य सुद्धा! मात्र आशय अतिशय उत्तम!

कुणाच्या वधाची असे बातमी
नभाचे असे रोज रक्ताळणे *
गोर किस दिलजलेकी है ये फलक...शोला इक सुबह याँसे उठता है
कुठल्या भग्नहृदयी माणसाची ही कबर आहे कुणास ठाउक्.......हे  आकाश म्हणजे !
रोज सकाळी त्याच्यात एक आगीचा लोळ निघालेला दिसतो.
सर्वश्रेष्ठ उर्दू शायर मीर यांचे आयुष्य ज्या ज्या घटनांनी भरलेले होते त्या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात दिसते. पण वैशिष्ट्य हे की बसल्या जागी विचार सुचायचेच असे की ते एक कवितेचे रूप घेउनच बाहेर पडायचे. असामान्य प्रतिभा!  जौक एकदा त्यांच्याकडे गेले अन नमस्कार करून बसले. मीरसाहेब जणू ध्यान लागल्याप्रमाणे स्वतःच्याच धुंदीत होते. ते बराच वेळ काहीच म्हणत नाहीत पाहुन जौक नमस्कार करून निघून गेले. तरी हे असेच बसलेले. कमालीच्या वरताण काव्य करण्यासाठी लागणारी मनस्थिती त्यांना आपोआपच लाभायची.
याच गझलेतील हे शेर पहा:
युं उठे आह उस गलीसे हम ( प्रेयसीच्या मुहल्ल्यातून हाकलुन दिले )
जैसे कोई जहाँसे उठता है
इश्क इक मीर भारी पत्थर है
बोज कब नातवॉंसे उठता है ( नातवा - कमजोर )
अत्यंत तुसड्या स्वभावाच्या मीरसाहेबांच्या एका गझलेतील शेरावर हिंदी चित्रपटात एक गाणे रचून त्या गझलेवर बर्‍यापैकी अन्याय करण्यात आला आहे.
दिखाई दिये युं के बेखुद किया
हमे आपसेभी जुदा कर चले
त्यांचा 'पत्ता पत्ता बूटा बूटा' हा शेर सर्वश्रुत असून लोकप्रिय आहे.
अन सर्वात लोकप्रिय, आजही कुणाकडुनही कशाहीबाबतीत वापरला जाणारा शेर आहे:
इब्तिदा -ए -इश्क है रोता है क्या ( प्रेमाचा प्रारंभ)
आगे आगे देखिये होता है क्या
आमची कवी अनंतला अशी विनंती आहे की मीरसाहेबांची गाजलेली गझल 'फकिराना आये सदा कर चले' वर इथे त्याचा पूर्ण अनुवाद देऊन चर्चा घडवून आणावी. सगळ्यांना आनंदही होईल अन मराठी गझलेला थोडासा फायदा निश्चीतच होईल.
गोर किस दिलजलेकी है ये फलक्...वरून कवी अनंतने घेतलेला शेर सुद्धा चांगला आहे. पण त्याला थोडा सामाजिक वास आल्यासारखा वाटतो. तो वैयक्तिक अनुभुतीवर विसंबलेला वाटत नाही.  मीर यांच्या शेरामध्ये ते स्वतः प्रेमात अपयशी होते अशी जाणीव होते.
उत्तम गझल!


जशी फाटते तप्त धरणी तसे
तुझे आतल्या आत भेगाळणे     ... मस्त!
धृवा सांगते खूप काही मला
तुझे एकट्यानेच तेजाळणे          ... मस्त!
वेगळा विचार आहे.
कुणाच्या वधाची असे बातमी
नभाचे असे रोज रक्ताळणे *        ... हे ही छान.
'नभाचे रक्ताळणे..'  वा!   (तसा हा विचार जुना आहे. तरी छान.)
कलोअ चूभूद्याघ्या

भेगाळणे हा शेर फार आवडला!!

जशी फाटते तप्त धरणी तसे
तुझे आतल्या आत भेगाळणे

काही खास नाही. भेगाळणे - उपमा आवडली. गझल एकंदर जरा स्वस्तात गेलीय.
बरी+++
(तसा मी फारसा बोलत नाही.)

गझल आवडली.

 मा. बोलू का,
ही गझल स्वस्तात गेली आहे म्हणजे काय?
बरे ++ म्हणजे काय?
ही गझल अतिशय सुंदर आहे.  आपल्या विधानातून असे वाटत आहे की याहून खूपच दर्जेदार गझल येथे आहेत. तसे मत असल्यास त्या गझलांची यादी द्यावीत. मग आपल्या म्हणण्यातील सत्यासत्यता पडताळून पाहता येईल.
 

अनंतजी, मतला फार आवडला...
पुन्हा तेच..  रस्त्यात रेंगाळणे..असा बदल सुचववासा वाटला..
-मानस६



भेगाळणे, सांभाळणे
दोन्ही आवडले..

वाह..!! फारच आवडली गझल्..

जशी फाटते तप्त धरणी तसे
तुझे आतल्या आत भेगाळणे

कशाला कुणाची हवी सांत्वना
मला तू, तुला मीच सांभाळणे

सारेच शेर मनाला भिडणारे.