...देव आहे अंतरी
गझल...
तू मला टाळून कळले, लपविले जे अंतरी..
आणखी आणू नको तू आव कुठले अंतरी..!
दूर तू असतेस आता, काळजी कुठली नसे...
भेट की भेटू नको विश्वास आहे अंतरी..!
मन तुझे कळले मला शब्दांविना स्पर्शातुनी..
फारही सांगू नको तू ठेव थोडे अंतरी..!
मी तुला भेटायला इतके मुखवटे चढविले..
आणि ओळखलेस तेंव्हा भाव फुलले अंतरी..!
ती गुलाबाची कळी पाहून मी स्मरले तुला..
फुलत गेले आठवांचे रोम हर्षे अंतरी..!
आज तू पुसलेस अश्रू, पायही दमले तुझे..
केवढे छळलेस पूर्वी, काय पिकते अंतरी..?
घोषणा केलीस तू भेटायचे आहे पुन्हा..
पण मिठीच्या आत कळले फोलपण जे अंतरी..!
या मनाच्या वावराला दु:ख जळण्याचे नसे..
पण कुणी समजून घ्या हो, काय जळते अंतरी..!
शोधतो आहेस का रे 'अजय' फिरुनी विश्व हे..
मान की मानू नको पण देव आहे अंतरी..!!