गझल

सगळे काही पूर्वनियोजित , आपण नव्हतो
या व्यवहारामधे निमंत्रित  , आपण नव्हतो


संदेहाच्या परिघांवरती जगलो  आपण
म्हणावयाला कपोल कल्पित आपण नव्हतो

जेंव्हा केंव्हा भरून आले , रडते झालो
कुणी महात्मे अथवा प्रेषित आपण नव्हतो

दुनियेच्या दोषांवर देखिल प्रेमच केले
डाग मोजण्याइतके  शुचित आपण नव्हतो


वसंत कोठे निघून गेला , कळले नाही
कळावयाला तेंव्हा शुध्दित आपण नव्हतो

अनंत ढवळे

गझल: 

प्रतिसाद

मला खूप आवडली.
व्यवहारातले निमंत्रित, संदेहाचे परीघ,डाग मोजण्याइतके  शुचित...
वा,वा,वा...थोडी अनवट, पण माझ्या पसंतीची, चिंतनीय गझल.
माझाही एक चतकोर...:)
वाटेवरती भेटत गेली अवघड वळणे
हमरस्त्यावर पाउल टाकित  आपण नव्हतो

पहिले तीन शेर आवडले पण त्याहून महत्त्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे स्वतंत्र शैली. ही गझल वाचताना दुसर्‍या कुठल्या गझलची अथवा कवीची आठवण आली नाही.

सर्वांचे  आभार. या गझ्लेत ह्रस्व दीर्घाची प्रचंड ओढाताण मान्य आहे, पण  या विषयीची  माझी काही  मते आहेत .ती यथावकाश, सविस्तर " गझलेतील पेच " या लेखात मांडण्यचा विचार करतो आहे.

 

येऊ/येउ/येवू द्या.

सगळे काही पूर्वनियोजित , आपण नव्हतो
या व्यवहारामधे निमंत्रित  , आपण नव्हतो

वा वा! अल्केमिस्ट वाचताना त्यातील अरब राजाने सांगितलेले सार- त्याचा प्रत्यय आला. मक्तब/मक्तुब असा काहीसा शब्द आहे - अर्थ - सगळे आधीच लिहून ठेवलेले आहे.

संदेहाच्या परिघांवरती जगलो  आपण
म्हणावयाला कपोल कल्पित आपण नव्हतो

मस्त आहे.

जेंव्हा केंव्हा भरून आले , रडते झालो
कुणी महात्मे अथवा प्रेषित आपण नव्हतो
क्या बात है!


वसंत कोठे निघून गेला , कळले नाही
कळावयाला तेंव्हा शुध्दित आपण नव्हतो

भटांचा शेर आठवला

फुलावया लागलीस तेव्हा मला कुठे देहभान होते
वसंत आला निघून गेला,मला कुठे वर्तमान होते.

"आपण नव्हतो " कुठेही ओढून ताणून आल्यासारखे अजिबात वाटत नाही. एकूण गझल मस्त आहे.

सगळे काही पूर्वनियोजित , आपण नव्हतो
या व्यवहारामधे निमंत्रित , आपण नव्हतो >> मस्त !!

संदेहाच्या परिघांवरती जगलो आपण
म्हणावयाला कपोल कल्पित आपण नव्हतो >> क्या बात !!

दुनियेच्या दोषांवर देखिल प्रेमच केले
डाग मोजण्याइतके शुचित आपण नव्हतो >> व्वाह!