गझल : ज्यामुळे जग ही नशीली रम्यता राखून आहे

ज्यामुळे जग ही नशीली रम्यता राखून आहे
ते तुझे अपसव्य कुठली सव्यता राखून आहे

येथले अस्तित्त्व जपणे हे खरे खोटारडेपण
बन अशी आख्यायिका जी सत्यता राखून आहे

तोडले केव्हाच आपण आपले नाते तरीही
का अशी , ते एक हल्की तन्यता राखून आहे

जीवघेण्या वेदनांवर हासणारी सांत्वने ही
पण तरी कळीज माझे सभ्यता राखून आहे

दाद द्यावी ह्या, मनाच्या एवढ्याश्या ओसरीला
एवढ्या दाटीतही जी , भव्यता राखून आहे

विठ्ठला तू ऐकशिल ना तर तुझ्या झरतील आर्ता**
आजही मन त्या गझलची शक्यता राखून आहे

-वैवकु

गझल: 

प्रतिसाद

**आर्ता = आर्त आहे अशी ती . आर्त करते अशी ती . अंतःकरणाच्या आर्ततेतून अस्फुटपणे ओठांवर येते ती "आह!" ही दाद .ह्या शब्दाचे अनेकवचनही मी आर्ता असे योजले आहे ( हिंदीत "आहेँ" ) ह्याच अनेकवचनी अर्थाने हा शब्द शेरात वापरला आहे.>>>>विठ्ठला तू ऐकशिल ना तर तुझ्या झरतील आर्ता (हा शब्द मुलीचे नाव म्हणूनही खूप सुंदर नाव ठरेल असे वाटत आहे .असो ! )
धन्यवाद .

दाद द्यावी ह्या, मनाच्या एवढ्याश्या ओसरीला
एवढ्या दाटीतही जी , भव्यता राखून आहे
वा. मस्त. गझल एकंदरच अगदी छान झाली आहे. आणि अगदी आवडली.