खोल डोहाच्या तळाशी साचलेला गाळ हो

खोल डोहाच्या तळाशी साचलेला गाळ हो
वा कुणी ना पोचते जेथे असे आभाळ हो

जाणत्यांच्या संस्कृतीला राहिलेला गर्भ तू
संपण्याची आणखी आरंभण्याची नाळ हो

तू नको खर्चूस ही माणूसकी जेथे तिथे
बस् कधी पडणार नाही जो असा दुष्काळ हो

येथले अस्तित्व कठपुतळीप्रमाणे मान तू
काळ आला आपला की आपला तू काळ हो

धाडले होतेस तेथे पाहिले राहून मी
ईश्वरा येथे तुझी शिजणार नाही डाळ हो

मी कसा आहे तुला जाणायचे झालेच तर
जे कुणीही ना कधी लाडावले ते बाळ हो

-'बेफिकीर'!

गझल: 

प्रतिसाद

खोल डोहाच्या तळाशी साचलेला गाळ हो
वा कुणी ना पोचते जेथे असे आभाळ हो
वाव्वा. फार आवडला मतला. 'बाळ' ही मस्त. 'डाळ हो' इथे रदीफ छान आले आहे.

मतला बेश्ट!

काळ हो हा शेरसुद्धा मस्त.