लाज !

.........................................
लाज ! 
.........................................

बांधले गेले जरी अंदाज काही !
योग्य नाही बोलणे मी आज काही !

खोल हो आधी सुमद्रासारखा तू....
कोरड्या वाळूस नसते गाज काही !

आव कोणीही किती आणोत आता...
आणता येणार नाही बाज काही !

बाब आधी मुद्दलाची संपवू या...
दे, नको देऊ, मला तू व्याज काही !

तृप्त पोटाचा मला सल्ला असा की -
लष्कराच्या भाकऱ्या तू भाज काही !

जो नको तो अर्थसुद्धा सांगती हे...!
शब्द कावेबाज, धोकेबाज काही !!

भंगली स्वप्ने; उमेदी संपल्या का ?
व्हायचे नाही असे नाराज काही !

राहिलो मी शांत, झाला फायदा हा....
बंद झाले येथले आवाज काही !

भीड माझीही अताशा चेपलेली...
राहिली नाही तुलाही लाज काही !

- प्रदीप कुलकर्णी

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

गझल: 

प्रतिसाद

खोल हो आधी सुमद्रासारखा तू....
कोरड्या वाळूस नसते गाज काही !

आव कोणीही किती आणोत आता...
आणता येणार नाही बाज काही !

समर्पक..!

खोल हो आधी सुमद्रासारखा तू....
कोरड्या वाळूस नसते गाज काही !
वाव्वा! क्या बात है!

आव कोणीही किती आणोत आता...
आणता येणार नाही बाज काही !
वा....

भीड माझीही अताशा चेपलेली...
राहिली नाही तुलाही लाज काही !
वा...
अगदी खणखणीत झाली आहे गझल.

तृप्त पोटाचा मला सल्ला असा की -
लष्कराच्या भाकऱ्या तू भाज काही !

जो नको तो अर्थसुद्धा सांगती हे...!
शब्द कावेबाज, धोकेबाज काही !!       गझल आवडली.

 

 

 

सगळेच शेर आवडले. त्यातही गाज आणि आवाज तर अप्रतिम!!!
कोरड्या वाळूस नसते गाज काही !  -- वा वा वा. फार फार आवडले.

बाज, गाज आणि आवाज फार फार आवडले... सुंदर आणि आपल्या सर्व गझलांप्रमाणेच सहज पण खूप अर्थवाही, अनुभूतीदर्शक....छान...
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

लाज आणि गाज हे शेर खूप आवडले.

गाज, भाज आणि  आवाज  हे शेर  विशेष  आवडले.

बाज-गाज-व्याज नाही आवदले. हे शब्द आशय सौंदर्य हानी करणारे आहेत.तंत्र द्र्श्ट गज़ल सकस आहे.

राहिलो मी शांत, झाला फायदा हा....
बंद झाले येथले आवाज काही ! .. हा शेर सही उतरला आहे...अतिशय चांगला आशय

बंद झाले आतले आवाज काही.. असेही सुचले..
-मानस६

गझल आवडली, खासकरून -

बांधले गेले जरी अंदाज काही !
योग्य नाही बोलणे मी आज काही !

आव कोणीही किती आणोत आता...
आणता येणार नाही बाज काही !

राहिलो मी शांत, झाला फायदा हा....
बंद झाले येथले आवाज काही !

भीड माझीही अताशा चेपलेली...
राहिली नाही तुलाही लाज काही !