वादात या कुणीही सहसा पडू नये

येते मनात ते का सारे घडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये

वाटा नव्या जगाच्या हाकारती मला,
पाऊल टाकले ते जागी अडू नये!

आनंदसोहळ्याला हे दार वर्ज्य का?
का नौबती सुखाच्या येथे झडू नये?

गालास तीट काळी, आसू तसे हवे,
वाहून जन्म जावा, इतके रडू नये!

त्याच्याविना जरी मी आहे अनोळखी,
माझ्याशिवाय त्याचे काही अडू नये

काट्यांत गुंतला ना, निष्पाप, भाबडा?
जीवास काय ठावे, कोठे जडू नये?

आजन्म जीवनाचा मी शोध घेतला,
हे दैवजात होते, ते सापडू नये!

प्रतिसाद

अफलातून गझल....!!!
अर्थात नेहमीप्रमाणेच....
क्रांन्ति ...एक एक शेर अप्रतिम!!!