कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला
तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही
समकालीन गझल....
खूप जुनी गोष्ट आहे.प्रगतिशील लेखकांच्या मेळाव्यात मुंशी प्रेमचंद बोलले होते , "अब हमें हुस्न का मेयार बदलना होगा "...आता आम्हाला सोंदर्य शास्त्राचे निकष बदलावे लागतील.......
नव्या मराठी गझलकर्त्यांना मला आज हेच म्हणावेसे वाटते.
प्रत्येक युगातील साहित्यिकाना आपल्या काळाचे तीव्र भान असल्याचे , या साहित्यिका
चे लिखाण वाचताना जाणवते.नव्हे , ही तर चांगल्या साहित्याची कसोटीच आहे. ज्ञानेश्वरांचे अथवा तुकारामांचे साहित्य वाचताना, तत्कालीन परिस्थितीवर बराचसा प्रकाश पडतो, तो यामुळेच. कुठल्याही भाषेतील अभिजात साहित्याला, काही शतकानंतर इतिहासाचे स्वरूप प्राप्त होताना दिसून येते. मीर तकी 'मीर' च्या अनेक गझला तत्कालीन दिल्लीच्या राजकारणावर प्रकाश टाकताना दिसून येतात.
कविवर्य सुरेश भटांच्या गझलादेखील त्यांच्या काळाचे समर्थपणे प्रतिनिधित्व करताना दिसून येतात.
काळ बदलत जातो, नव्हे हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे. भारतीय समाजात नव्वदच्या दशकानंतर आलेली प्रचंड स्थित्यंतरे पाहाता, त्याचे पडसाद समकालीन साहित्यावर पडणे देखील क्रमप्राप्त आहे असे वाटते. सध्या लिहिल्या जाणार्या मराठी गझलेमध्ये आपल्या भवतालच्या परिस्थितीचे, समाज जीवनाचे व्यापक चित्रण व्हावे, असे मला वाटते. अर्थातच, प्रत्येकच वेळा हीच अनुभूती व्यक्त व्हावी असेही नाही. पण निदान आपले साहित्य काल सापेक्ष असावे, अशी अपेक्षा करणे फार चुकीचे आहे असे वाटत नाही.
अर्थातच सामजिक आशयाचे चित्रण \ रूपण करताना संभावणार्या अनेक धोक्यांपासून सावध राहणे देखील क्रमप्राप्तच आहे. कुठलीही सामाजिक रचना , शाब्दिक दृष्ट्या काहीशी ढोबळ असून तिचे सौंदर्य तिच्या आशयात दडलेले असते , ही वस्तुस्थिती मान्य करून देखील , निदान गझलेत तरी , सामाजिक आशयाचे व्यक्तीकरण करताना आपला स्वर संयत राहील याची काळजी घेणे गझल लिहिणार्या कवीसाठी आवश्यक आहे असे सांगावेसे वाटते .
गझलेच्या भाषेबद्दल...
कवितेची स्वतंत्र भाषा आहे. ती प्रत्येक वेळी प्रमाण भाषा असेलच असे संभवत नाही. ज्ञानेश्वरांची किंवा तुकारामांची भाषा तत्कालीन प्रमाण भाषा होती असे म्हणणे धाडसाचे ठरेल. या दोन्ही संतश्रेष्ठांनी आपल्या अवती भवती पसरलेल्या अप-प्रवृत्तींच्या विरोधात विद्रोह केला होता हे विसरून चालणार नाही. कवितेची भाषाच स्वतंत्र म्हटल्यावर तिची स्वतंत्र प्रतिमासृष्टी असणे देखील क्रमप्राप्त आहे. इथून पुढे मला वाटते संकेताचा भाग सुरु होते....
( क्रमश:)
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
प्रतिसाद
बराचसा जवळपास सहमत आहे. आपल्या कविता कालसापेक्ष असायला हव्यात म्हणून कवीने प्रयत्न करायला हवेत. पण
¨प्रत्येकच वेळा हीच अनुभूती व्यक्त व्हावी असेही नाही.¨
हे अगदी पटले. त्याचप्रमाणे सामाजिक आशयाचे गझलेत व्यक्तीकरण करताना ते संयतच असायला हवे असे नाही.
कवी स्वत:शी आणि स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहिला तर त्याची स्वत:ची अशी भाषा निर्माण होते, घडते. पण बहुतेक कवींच्या कविता वाचून त्याच्या जीवननिष्ठा, त्यांना प्यार असणारी किंवा नसणारी विचारसरणी (डावी, उजवी, खाली, वगैरे, वगैरे) काही कळत नाहीत. ह्या अशा चेहर नसणार्या कविता कालौघात टिकतील की नाही जरा शंकाच आहे.
कालसापेक्षतेबद्दल माझे मत-
१. गझलकाराने सामाजिक आशयाची गझल (/द्विपदी) लिहायची तर ती निश्चितपणेआजच्या समाजाच्या वैचारिक बैठकीला अनुसरून असली पाहिजे. नाहीतर तिला अनुकरणाव्यतिरिक्त दुसरे काहीही म्हणता येणार नाही.
२. गझलकाराने केलेली 'मी'ची (व्यक्तिगत /इन्ट्रोव्हर्ट/ अंतर्गामी) गझल(/द्विपदी) गझलकाराच्या अंतर्मनात निर्माण झालेल्याकाळानुरूप असावी. तिच्यात बाहेरच्या जगाचे पडसाद असतील तर बाहेरचे आवाज मात्र आजचेच हवेत. आठवणींचे पडसाद असतील तर मग त्यांचा काळ कोणताही असू शकतो.<?xml:namespace prefix = o ns = "urn:schemas-microsoft-com:office:office" />
३. शाश्वत सत्ये सांगणार्या गझला (/द्विपदी) कालातीत असतात.चित्त यांचे म्हणणे थोडेफार पटते. पण कवी हादेखील माणूसच असतो. त्यामुळे त्याची मते, विचार हे कायमचे तसेच राहतील याची खात्री देता येत नाही. त्यामुळे त्याने केलेल्या रचना त्याच ठशातून येत रहातीलच असे नाही. (चर्चिलचे वाक्य आठवते -इथे पहा.)
सार्याच 'इझम्स'चा पारा उडाल्याने कोणत्या विचारसरणीवर विश्वास ठेवावा हे ठरवणे दुरापास्त झाले आहे. कदाचित चेहरा नसणे हीच आजच्या व्यक्तिमत्वाची ओळख बनत चालली आहे असे म्हणावे लागेल. मग यापुढे केलेल्या अशा सार्याच रचना कालौघात वाहून जाणार काय?
(अध्याहृत अवांतर- जर रचनांना कोणत्याही विचारसरणीची आणि पर्यायाने समुदायाची/कळपाची कुबडी लागत असेल तर ते अभिजात साहित्य कसे ठरू शकेल? याउलट काही अभिजात रचनांना समुदायांनी/ कळपांनीच आपली कुबडी बनवले असेही चित्र दिसते.)
ता.क. दुव्याची दुरुस्ती करताना हा चित्तरंजन यांच्या प्रतिसादाअगोदरचा प्रतिसाद नंतर नमूद होत आहे. तेंव्हा तो त्या क्रमाने करावा अशी संपादकांना विनंती.
आता सार्याच 'इझम्स'चा पारा उडाल्याने कोणत्या विचारसरणीवर विश्वास ठेवावा हे ठरवणे दुरापास्त झाले आहे.
असे मला वाटत नाही. अगदी पोथीतल्या विचारांबद्दल मी इथे बोलत नव्हतो. (म्हणजे मार्क्स दास क्यापिटल मध्ये किंवा इतर कुणी इतर कशात काय लिहिले आहे.)
अगदी नेहमीचे (क्लीशे) बोलायचे झाल्यास माणूस पृथ्वीतलावर असेपर्यंत रोटी, कपडा आणि मकान ह्या मूलभूत गरजा त्याला भागवाव्या लागणार आहेत. विषमताही एकदम नाहीशा होणार्या नाहीत. समानता हवी,सगळ्यांना पुरेसे अन्न हवे, मूठभर लोकांची मक्तेदारी नाहिशी व्हायला हवी, आदी विचार तसे न संपणारे आहेत.
माझ्यामते ऐहिक सुखे सहजपणे मिळत आहेत, पगार वाढले आहेत, सगळीकडे चंगळ आहे. आणि जे हे सगळे उपभोगत आहेत त्यांचा वर्ग हा वैचारिक तृतीयपंथीयांचा वर्ग झाला आहे, असे मला वाटते. ह्या लोकांना नक्की कशावर विश्वास ठेवावा हे ठरवणे कठीण झाले आहे. आयन रँडपासून कार्ल मार्क्सपर्यंत, सावरकरांपासून गांधींपर्यंत सगळेच त्यांना सारखीच (बहुधा) भुरळ पाडतात.
पण नाना तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे तरी (म्हणजे सगळ्या विचारसरणी फोल आहेत वगैरे) किमान यावे मग लिखाणात. माझ्या प्रतिसादात मी असणार्या वा नसणार्या विचारसरणीचा उल्लेख केला आहे.
जर रचनांना कोणत्याही विचारसरणीची आणि पर्यायाने समुदायाची/कळपाची कुबडी लागत असेल तर ते अभिजात साहित्य कसे ठरू शकेल?
का नाही बरे? हे ठरवणारे आपण कोण? (तसेच कुबडी की काय हे कोण ठरवणार?) अभिजात साहित्याचे असे निकष कोणी ठरवले आहेत काय? आणि ठरवले असल्यास त्यांत असे नमूद केले आहे काय? असे त्यांत नमूद केले असल्यास ते मानायचे काय?
मूळ चर्चेला सोडून एक विषयांतर-
चित्त यांच्या प्रतिसादास प्रतिसाद -
अगदी नेहमीचे (क्लीशे) बोलायचे झाल्यास ...आदी विचार तसे न संपणारे आहेत.
माझ्यामते ऐहिक सुखे...भुरळ पाडतात.
हे खरे! पण प्रसिद्धी माध्यमांच्या सततच्या मार्यामुळे आणि प्रत्येक वाईट बातमीचे भांडवल करून आपलीच पोळी भाजण्याच्या प्रयत्नामुळे (उदा. खैरलांजीची बातमी देताना किंवा त्यावर चर्चा करताना मध्येच- कोणत्यातरी सौंदर्यप्रसाधनाची किंवा खाद्यपदार्थाची जाहिरात मालिका - कारण High TRP Rating) लोकमानसाची ग्रहणशक्ती आणि विचारशक्ती क्षीण होत चालली आहे.
अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा ज्यांना आहेत तेही या दुष्ट्चक्रातून सुटलेले नाहीत. ढळढळीत उदाहरण द्यायचे तर मी जिथे राहतो त्या शहरात महिन्याकाठी केवळ २०००- ३००० रु. कमावणारा हप्त्याने ४०,००० रू.किमतीची नवी मोटरसायकल घेतो.सेकंड हँड त्याच्या इभ्रतीला शोभत नाही. त्याच कमाईचा दुसरा कुणी," हॅ, रेशनचा तांदूळ गरीब लोक घेतात" , असे तुच्छतादर्शक उद्गार काढतो. एक रिक्षावाला आपल्या जावयाला १ लाख रु. हुंडा देतो. आज प्रत्येक झोपडीत एकवेळ अन्न नसेल पण टी. व्ही. नक्की असेल. साधा हमालही खिशात मोबाईल फोन घेऊन फिरेल. ही माझ्यासारख्या मध्यममार्गी माणसाची पोटदुखी नाही - तळमळ आहे. चंगळवाद फक्त भरपूर पगार असलेल्या लोकांमध्ये आहे असे नाही. तो समाजात सगळीकडेच फोफावला आहे. सारेच वैचारिक नपुंसक झालेले आहेत. हे सारे आजच्या पिढीचे चित्र आहे.
मक्तेदारीबद्दल म्हणाल तर "सनदशीर मार्गाने मिळत नाही मग हिसकावून घ्या " ही तर आजची घोषणाच आहे. कुणाची मक्तेदारी उरली आहे? आणि वेठबिगारीची रीत इथे जितकी आहे तितकी तुम्ही रहाता तिथे नाही. इथे लोक आपल्याच मुलांचा बाजार मांडताना मी पाहिले आहेत. हे लोक आपली मुले अशी भाडयाने जाणीवपूर्वक देतात. त्यांना त्याचे काहीही दु:ख नसते. हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. घराघरात अशी लहान मुले/मुली राबतात. १०,००० रु.ना एक १० वर्षे वयाची पोर कुणालाही पाच / सहा वर्षे घरकामाला ठेऊन घेता येईल. त्याविरुध्द आंदोलने करणार्यांच्याच घरात असे नोकर असल्याचे निदर्शनास आले आहे. याला काय करावे?
त्यामुळेच आज कोणीही कितीही समजवायचा प्रयत्न केला तरी - "तू कोण मला शिकवणारा?" हेच ब्रीदवाक्य ऐकू येते. मग तो संपन्न सुशिक्षित असो किंवा गरीब अशिक्षित! "ज्याची खावी पोळी फक्त त्याचीच वाजवावी टाळी"
आयन रँडपासून कार्ल मार्क्सपर्यंत, सावरकरांपासून गांधींपर्यंत सगळेच त्यांना सारखीच (बहुधा) भुरळ पाडतात.
या सगळ्या विचारसरणी/ण्या रात्रौ रंगणार्या चर्चेत "मला किती माहिती आहे" हे सांगण्यासाठी चकण्यासारख्या चाखायला वापरल्या जातात. तो 'हा' त्या ढमक्या पुस्तकात असे म्हणतो, ते अमक्याचे मत त्या तमक्याने किती सुंदर (?) खोडले आहे. इत्यादि आणि वगैरे... हे जगजितसिंगच्या कार्यक्रमाचे ५००० रु.चे तिकिट काढून "कागज की कश्ती" ला 'वा..वा..' करण्यासारखे आहे.सगळे जगच बेगडी होते आहे.
अभिजात साहित्याचे असे निकष कोणी ठरवले आहेत काय?...
पुस्तकी निकष कशाला हवेत? सोने ते सोनेच! एखादे वाङ्मय अभिजात आहे की नाही ते प्रत्येक वाचकाला आत जाणवते. मग त्याने कितीही नाक मुरडले तरी त्याचा झळाळ संपत नाही. माझे मत असे आहे की कळपाने बँ बँ करून त्याला पसंती देण्याची गरज नसते. उलट जे प्रतिभासंपन्न लोक असे साहित्य लिहितात त्यांच्या प्रभावळीत राहून थोडा प्रकाश आपल्यावरही पडेल असे वाटणारे अनेक जण कंपू बनवतात आणि त्या साहित्यिकावर आपला हक्क सांगतात. मग त्या लिलिपुट लोकांमध्ये गलिव्हरही बंदी बनतो.(हे नेतेमंडळींनाही लागू पडते.)
ही माझी वैयक्तिक मते आहेत. ती मी उघड मांडली आहेत याचाच अर्थ त्यांवर टीकाटिप्पणी करण्याचा अधिकार प्रत्येक वाचकाला आहे हे ओघाने आलेच.
त्यामूळे एवढेच म्हणावेसे वाटते की नव्या गझलेत ही नवी सामाजिक आणि मानसिक परिस्थिती खरी-खरी उतरली पाहिजे.अशा नव्या गझलांची उदाहरणे याच संकेतस्थळावर आता सापडत आहेत हे अभिनंदनीय आहे. असे नवे लेखन अधिकाधिक व्हावे असे वाटते.
चंगळवाद फक्त भरपूर पगार असलेल्या लोकांमध्ये आहे असे नाही. तो समाजात
सगळीकडेच फोफावला आहे. सारेच वैचारिक नपुंसक झालेले आहेत. हे सारे आजच्या
पिढीचे चित्र आहे.
काही
किमान गरजा अगदी चांगल्या रीतीने पूर्ण झाल्यावर नीतिमत्ता, मरॅलिटी आदी
गोष्टींच्या गप्पा करता येतात, अशा अर्थाचे तेंडुलकरांनी (म्हणजे
इतरांनीही म्हटले असेलच) कुठेतरी म्हटले होते. ज्यांचे सगळे काही अगदी
व्यवस्थित चालले आहे, त्यांना अशी तळमळ परवडण्यासारखी असते. त्यांचे मौन
घातक असते.
त्यामुळेच आज कोणीही कितीही समजवायचा प्रयत्न केला तरी - "तू कोण मला शिकवणारा?" हेच ब्रीदवाक्य ऐकू येते.
यात काही गोष्टी आहेत. एक म्हणजे आपण ज्याला समजावतो आहे त्याला मला सगळे
काही कळते असा गैरसमज झाला असतो किंवा आपण खरेच त्याला शिकविण्याचा
प्रयत्न करत असतो किंवा आपण त्याला शिकवतो आहोत असे त्याला वाटत असते
किंवा आपण त्याला शिकविण्याचा प्रयत्न करतो आहोत हे त्यालाआवडत असते. आपण
आपल्या परीने प्रामाणिक मत देण्याचा प्रयत्न करावा. इतरांना पटले तर घेतील
नाही तर सोडून देतील.
या सगळ्या विचारसरणी/ण्या रात्रौ रंगणार्या चर्चेत "मला
किती माहिती आहे" ...जगजितसिंगच्या कार्यक्रमाचे ५००० रु.चे तिकिट काढून
"कागज की कश्ती" ला 'वा..वा..' करण्यासारखे आहे.सगळे जगच बेगडी होते आहे.
हाहाहाहा. हे आधीही होते. जग बेगडी कधी नव्हते. पण एक मात्र खरे की
बेगडीपणा फार व्यापक आणि ठळक झाला आहे. कारण जगही वाढले आहे. कारण
जगजितसिंगाचा कार्यक्रम 'अफोर्ड' करू शकणारा नवश्रीमंत वर्गही वाढला आहे.
पुस्तकी निकष कशाला हवेत? सोने ते सोनेच! एखादे वाङ्मय अभिजात आहे की नाही
ते प्रत्येक वाचकाला आत जाणवते. मग त्याने कितीही नाक मुरडले तरी त्याचा
झळाळ संपत नाही.
हेच. आणि दुसरे गोष्ट म्हणजे काळाची कसोटी. समकालीन इतिहासाप्रमाणेच,
समकालीन समाज समकालीन साहित्याचे अचूक मूल्यमापन करीलच असे नाही. तूर्तास
एव्हढेच.
चित्तसाहेब, आपला प्रतिसाद बर्याच अंशी (९९%) पटला.
ज्यांचे सगळे काही अगदी व्यवस्थित चालले आहे, त्यांना अशी तळमळ परवडण्यासारखी असते.-
असे म्हटले तर मग - 'समाजाच्या कल्याणाबद्दल फक्त (ज्यांचे सगळे व्यवस्थित चालले आहे अशा) सुखवस्तु लोकांना विचार करणे परवडते म्हणून फक्त त्यांनीच तो तळमळीचा विचार केला पहिजे आणि इतरांना त्याचे काहीच सोयरसुतक नसावे कारण त्यांचे सगळे व्यवस्थित चाललेले नाही , त्यांना ते परवडत नाही. त्यांना कसेही / अविचाराने वागण्याची सूट आहे' - असा अर्थ निघू शकतो.
माझे म्हणणे इतकेच की वर्गभेदाचा विचार न करता सार्यांनीच योग्य विचार केला पाहिजे, तो मांडला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागले पाहिजे.ही (माझ्या-तुमच्या- त्यांच्यासह)समस्त जनतेची जबाबदारी आहे.
- हाच तो उरलेला १%.
त्यांचे मौन घातक असते. -
हे मात्र एकदम १००% पटले. विशेषतः 'हू केअर्स?' लोक!
तेंडुलकरांनी (म्हणजे इतरांनीही म्हटले असेलच) -
हा! हा! हा! यातला अर्थ मुद्दाम ठेवला आहे काय?;)
डॉ. अनंतराव,
आपला हा मुद्दा!
सध्या लिहिल्या जाणार्या मराठी गझलेमध्ये आपल्या भवतालच्या परिस्थितीचे, समाज जीवनाचे व्यापक चित्रण व्हावे, असे मला वाटते. अर्थातच, प्रत्येकच वेळा हीच अनुभूती व्यक्त व्हावी असेही नाही. पण निदान आपले साहित्य काल सापेक्ष असावे, अशी अपेक्षा करणे फार चुकीचे आहे असे वाटत नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------------
माझे मत!
अनुभुती घेतल्यानंतर प्रत्येक माणसाच्या मेंदूत त्या अनुभुतीबद्दल एक नैसर्गीक प्रतिसाद उमटतो. त्यावर माणसाचे नियंत्रण असू शकत नाही. त्या माणसाचे जन्मस्थान, सरांउंडिन्ग्ज, वय, आर्थिक स्तर, जात्/धर्म, भौगोलिक व सामाजिक परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती अशा अनंत घटकांवर 'तो काय प्रतिक्रिया देईल' हे विसंबून असते. त्यातील कोणी 'पद्यात्मकतेकडे' झुकून 'कवितारुपात' ( अगदी त्याच क्षणी असे म्हणत नाही आहे, काही काळानंतर वगैरे ) आपली अनुभुती 'जुळवतात / लिहितात / स्वतःच वाचतात / मर्यादीत लोकांना वाचायला देतात / प्रकाशित करतात'.
तसेच, अनुभुती ही 'घेतलेलीच' असेल असे नसून 'पाहिलेली / ऐकलेली / वाचलेली' असू शकेल.
आता जर सगळ्याच गोष्टी नैसर्गीक आहेत, तर 'या काळातील कविता कशी व्हावी' याबाबत निकष मांडणे या गोष्टीला माझ्यामते काही अर्थच उरत नाही. ज्याला जशी वाटली तशी कविता. ( इथे आपण गझलांबाबत बोलत आहात म्हणून गझला.) माझ्यामते ज्ञानेश्वर, तुकाराम, मीर व भटसाहेब यांनी ठरवून कवितेत काही आणले नसावे. त्यांना जे लिहायचे होते / लिहावेसे वाटले ते त्यांनी लिहिले असणार!
मात्र, माझ्यामते, गझल हा काव्यप्रकार निर्माण होण्याच्या काळात व भरभराटीच्या काळात असताना 'सामाजिक आशयाचा समावेश' त्यात फार म्हणजे फारच कमी झाला. मुख्यत्वेकरून प्रेम व दु:ख यांचा समावेश दिसतो. तंत्र तेच वापरून अनेक उर्दूही गझलकारांनी सामाजिक व विनोदी ( हसीनोंके बाप मरजाये वगैरे ) स्वरुपाच्या गझला नक्कीच केल्या, पण भिडतात त्या व्यक्तीगत आयुष्याशी निगडीत असलेल्याच!
माझ्या मते आपल्यासारख्या जाणत्या गझलकाराने 'सामाजिक गझल' ही टर्मिनॉलॉजी अस्तित्वात आणू नये हे विधान अधिकाराने करायला हवे. गझल ही गझल असावी, त्यात हळुवारपणा, सर्वांना आपला वाटेल असा आशाय मात्र तरीही व्यक्तीगतता असाव्यात. ( हे माझे वैयक्तिक मत आहे.) गझलेचा आशय कुठल्या विषयाशी निगडीत असावा याबाबत काहीतरी ठोक भूमिका आपल्यासारख्यांनी घ्यायला हवी म्हणून मी कायम आग्रही राहणार आहे. कारण माझ्यामते पोवाडे, लावण्या, विद्रोही कविता, मुक्तछंद, ओवी, अभंग, भावगीत हे काव्यप्रकार इतर प्रकारचे आशय हाताळायला व्यवस्थित समर्थ असून पोवाड्याने किंवा विद्रोही कवितेने सहज उचलावा असा सामाजिक आशय गझलेवर भार होऊ नये असे वाटते.
तेव्हा, गझलकारांनी कालसापेक्षतेचे भान ठेवणे हे 'सुचण्याच्या प्रक्रियेच्या' दृष्टीकोनातून अनैसर्गीक वाटते तर आशयाबाबत आपल्याकडून काही लिहिले जावे अशी इच्छा प्रदर्शित करतो.
धन्यवाद!