... भांडू नकोस राणी

पाहून पाठ इकडे फिरवू नकोस राणी
इतके महत्त्व कोणा देऊ नकोस राणी

आयुष्य वेचलेले समजून घे जरासे
नुसती फुले सकाळी चढवू नकोस राणी

तू कालच्याप्रमाणे नव्हतीस आजही अन
बाता तरी उद्याच्या मारू नकोस राणी

जमले न घालणेही फुंकर जरा मनावर
खपल्या तरी व्रणाच्या काढू नकोस राणी

जमले तुला न होते सगळेच सांगणेही
खोटे तरी कुणाशी बोलू नकोस राणी

होतो कधी तुझा मी; होईनही कदाचित....
इतक्यात भाव कुठला खाऊ नकोस राणी

बोलू नकोस किंवा कौतुक नको करू तू...
इतकी तुला विनंती...., भांडू नकोस राणी

गझल: 

प्रतिसाद

आयुष्य वेचलेले समजून घे जरासे
नुसती फुले सकाळी चढवू नकोस राणी

वा वा.... खूप भावला हा शेर.... सुंदर गझल अजय जी

जमले तुला न होते सगळेच सांगणेही
खोटे तरी कुणाशी बोलू नकोस राणी

छान शेर, आवडला.

सौम्य आणि बोलकी गझल.

छान गझल.

धन्यवाद!

तू कालच्याप्रमाणे नव्हतीस आजही अन
बाता तरी उद्याच्या मारू नकोस राणी

हा खूप भावला शेर!

सहज साधी गझल!

धन्यवाद सुप्रिया.