वायदे बाजार




पाहण्याला लोक सारे लोटले
रान शब्दांनी कसे हे पेटले


रोज ठिगळे सांग लावावी किती
रोज हे आभाळ असते फाटले


ह्या सुखाला आज टाळावे कसे
पाहिजे तेव्हा न होते  भेटले

का अशाने देव कोणा पावला
पाय दगडाचे कशाला चाटले


पाळले होते मनाने सोवळे
काल नजरेने तुझ्या ते बाटले

पिंजर्‍यावर प्रेम माझे येव्हढे
पंख ही माझे स्वतः मी छाटले

बदलला मी चेहरा माझा तरी
मांजरागत दुःख मजला खेटले


राख होताना तरी बघण्या मला
तू इथे येशील होते वाटले

वेदनेचा भाव वाढू लागला
वायदे बाजार त्यांनी  थाटले


आसवांची काढली समजूत मी
अन पुन्हा आयुष्य थोडे रेटले




गझल: 

प्रतिसाद

आसवांची काढली समजूत मी
अन पुन्हा आयुष्य थोडे रेटले
अतिशय सुंदर! पण येथे मीटर बद्दल जरा शंका येतेय... दुस-या ओळीत.. चू.भु.द्या.घ्या.

पाहण्याला लोक सारे लोटले
रान शब्दांनी कसे हे पेटले?
छान.

रोज ठिगळे सांग लावावी किती?
रोज हे आभाळ असते फाटले
वाव्वा!

रोज ठिगळे सांग लावावी किती?
आजही आभाळ आहे फाटले
असे मी वाचले.

ह्या सुखाला सांग टाळावे कसे
(पाहिजे होते न तेव्हा भेटले)
वा! छान! 

पण सुखाला टाळण्याचा आणि त्याच्या पाहिजे होते न तेव्हा न भेटण्याचा संबंध अधुरा आहे. टाळावे ऐवजी दुसरे काही तरी हवेसे वाटते. सुख जेव्हा हवे तेव्हा भेटले नाही. आता भेटले तर त्याला नीट भेटताही येत नाही, असे काहीसे तुला म्हणायचे असावे.  

ह्या सुखाला आज टाळावे कसे?
ते मला आता कशाला भेटले?

असे काहीसे मला लिहावेसे वाटले.
पिंजऱ्याच्या आज ह्या प्रेमात मी
पंख ही माझे स्वतःचे छाटले
वा!
आज ह्या  भरीचे वाटते.
पिंजर्‍याच्या एवढा  प्रेमात मी
पंख माझे मी कधीचे छाटले
असे मला सुचले.

राख होताना तरी बघण्या मला
तू इथे येशील होराख होताना तरी
वाव्वा!
वेदनेचा भाव वाढू लागला
वायदे बाजार सुद्धा (त्यांनी) थाटले
वा! छान! पण अधुरा वाटतो. कसे आणि कोणी थाटले हे काही कळत नाही. कल्पना मस्त आहे.
आसवांची काढली समजूत मी
अन पुन्हा आयुष्य थोडे रेटले
वा, वा!

गझल सफाईदार आणि चांगली आहे. उद्गारवाचक आणि प्रश्नार्थक चिन्हांचा उपयोग करावा.

छान आहे गझल.
पिंजर्‍याचा आणि मांजरागत दु:खाचा शेर विशेष आवडला.

 

पिंजरा, मांजर आणि राखेचे शेर आवडले.

वेदनेचा भाव वाढू लागला
वायदे बाजार त्यांनी  थाटले
वा...वा...! छान आहे शेर.
या शेरावरून मला माझी जुनी गझल आठवली. २००२ मध्ये लिहिलेली. तिचा मतला असा -
वेदना माझी मला रस्त्यात थाटू लागली !
आसवांनाही अखेरी लाज वाटू लागली !
ही पूर्ण गझल नंतर कधीतरी या संकेतस्थळावर सादर करीन.
तुझ्य़ा शेरामुळे मनात पुन्हा ही जुनी गझल जागी झाली....
.................
ह्या सुखाला आज टाळावे कसे
पाहिजे तेव्हा न होते  भेटले

आसवांची काढली समजूत मी
अन पुन्हा आयुष्य थोडे रेटले
या कल्पनाही आवडल्या. त्यातही आयुष्य रेटले...अप्रतिम.
..........................................
 अलामतीचा घोळात घोळ का घातलास बरे  ?
..........................................

मतला आणि रेटणे आवडले! 'मांजरागत खेटणे' - वा वा!! खूपच छान..
-- पुलस्ति.

गझल छान आहे
---अगस्ती