चमकण्याचे अचानक कारण येते...

चमकण्याचे अचानक कारण येते
तिथे नेमके चंद्रास ग्रहण येते

धान्य पिकविले तू आणि मी सारखे
फरक इतकाच की तुला दळण येते

खेळू नकोस मनाशी! लक्षात घे -
हे, कि तुझ्याइतकेच मलापण येते

बदलू नये कुणीच केंव्हा कुणाचे
असते नशीब तिथे देवपण येते

घडते असेच प्रेम..! का ? कोण जाणे ..
जिथे जावे सरळ, तिथे वळण येते

हे रोजचे नाही जळणे मनाचे
येते ! कधी तुझीच आठवण येते...

चल, करूया गुंठेवारी मनाची,
अन् मला कुठे करता भांडण येते...?

प्रतिसाद

धान्य पिकविले तू आणि मी सारखे
फरक इतकाच की तुला दळण येते

बदलू नये कुणीच केंव्हा कुणाचे
असते नशीब तिथे देवपण येते

व्वा ! दळणाचा शेर अप्रतिम आहे....अभिनंदन

खुप आवडली. धान्य, नशीब, गुंठेवारी आणखी आवडले.

धान्य पिकविले तू आणि मी सारखे
फरक इतकाच की तुला दळण येते

बदलू नये कुणीच केंव्हा कुणाचे
असते नशीब तिथे देवपण येते

हे विशेष आवडले.

वा वा....मस्तच !!
वळण, दळणाचे शेर लाजवाब !

अजयजी, वाह वाह्....बहोत खुब.....

धान्य पिकविले तू आणि मी सारखे
फरक इतकाच की तुला दळण येते
खेळू नकोस मनाशी! लक्षात घे -
हे, कि तुझ्याइतकेच मलापण येते

सुरेख ग़ज़ल....
` ख़लिश ' - वि. घारपुरे. १६-०३-२०१०.

दळण, मलापण, वळण, आठवण खूप आवडले!

गुंठेवारीचे प्रयोजन कळले नाही.

प्रतिसाद देण्यार्‍या - न देणार्‍या सर्वांचे धन्यवाद..!
आनंदयात्री,
तसे गुंठेवारीला कुठे प्रयोजन असते...:)

मला कोणतीच ओळ लयीत वाचता आली नाही. त्यामुळे ओळी गद्यासारख्या वाचाव्या लागल्या.

दळणाचा शेर चांगला जमला आहे.

गझल तालात वाचता येणे हे गझलेच्या अनेक सौंदर्यांपैकी एक आहे. (मात्रावृत्तातीलही गझलांबाबत म्हणतोय.) मात्र ते (गझलेच्या ) प्रवेशद्वारावरील पहिले सौंदर्य आहे. त्यामुळे ते महत्वाचे ठरते. आपण ही गझल लयीत वाचू शकत असाल याची खात्री आहे, कारण त्याशिवाय आपण ही गझल रचलीच नसतीत. :)

एकंदर आपणही आता 'तुझे-माझे' कडे वळलात की काय असे वाटायला वाव आहे या रचनेत. :)

दळण...वळण आवडले

वळण, आठवण खास! गझल आवडली.

बेफिकीर, श्यामली, क्रान्ति धन्यवाद...!
बेफिकीर,
एकंदर आपणही आता 'तुझे-माझे' कडे वळलात की काय असे वाटायला वाव आहे या रचनेत. :)
याबद्दल मी सध्या काहीही बोलणार नाही.

धान्य पिकविले तू आणि मी सारखे
फरक इतकाच की तुला दळण येते

अत्युत्तम! एकंदर छान.

मला कोणतीच ओळ लयीत वाचता आली नाही. त्यामुळे ओळी गद्यासारख्या वाचाव्या लागल्या.
नुसत्याच मात्रा मोजून गझलेच्या ओळी लिहू नयेत. अर्थात हे पुन्हा पुन्हा सांगून फायदा होतोच असेही नाही.

अवांतर:

कवी बींची माझी कन्या नावाची प्रसिद्ध कविता आहे

गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या ?
का ग गंगायमुनाहि या मिळाल्या ?
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला ?

उष्ण वारे वाहती नासिकात
गुलाबाला सुकविती काश्मिरात,
नंदनातिल हलविती वल्लरीला,
कोण माझ्या बोलले छबेलीला ?
...........

.....वगैरे वगैरे.. ही कविता कुठल्या वृत्तात आहे ते माहीत नाही. पण वरील गझलेतील काही ओळी त्या लयीत म्हणता येतात. असे असले तरी.

धन्यवाद चित्तरंजन.
नुसत्याच मात्रा मोजून गझलेच्या ओळी लिहू नयेत. अर्थात हे पुन्हा पुन्हा सांगून फायदा होतोच असेही नाही.
** हे विधान - नुसत्याच मात्रा मोजून गझलेच्या ओळी लिहू नयेत. - या गझलेसाठी आहे काय..? नुसत्याच मात्रा मोजून = याचा अर्थ आशयाच्या दृष्टीने बारा वाजले असा समजायचा का?
** गझलेचा शेर काय फक्त गाण्यासाठीच असतो का? ... आणि हो.., सध्यातर मुक्तछंदही चालीत म्हणतात म्हणे. अर्थात, तशी गझल लिहावी अशा मताचा मी नाही. लय ही भावनांची असावी. शेर हा बोलण्यासाठी नसावा का? फक्त गाण्यासाठीच असावा का..?

अवांतर :::
कवी 'बी' यांची ही कविता मनात रुजली नाही. मात्र त्यातील 'चित्तचोरटीला' हा शब्दप्रयोग आवडला...:)

** हे विधान - नुसत्याच मात्रा मोजून गझलेच्या ओळी लिहू नयेत. - या गझलेसाठी आहे काय..? नुसत्याच मात्रा मोजून = याचा अर्थ आशयाच्या दृष्टीने बारा वाजले असा समजायचा का?

नाही. आशयाचा विचार केलेला नाही. केवळ लयीचाच विचार केलेला आहे.

लय ही भावनांची असावी.

भावनांची लय हा गूढगहन चर्चेचा विषय आहे. त्यासाठी वेगळा धागा सुरू करायला हवा. मुक्तछंदातही एक लय अपेक्षित असते. पण तंत्राचा विचार केला तर गझल आणि मुक्तछंदात जमीन-आस्मानाचा फरक आहे.

शेर हा बोलण्यासाठी नसावा का? फक्त गाण्यासाठीच असावा का?

गझलेचा शेर वाचतानाही एक लय जाणवायला हवी. (अक्षरगणवृत्तात ही अडचण येत नाही. ) पण तुमच्या मात्रावृत्तातल्या ह्या गझलेत लय जाणवत नाही. त्यापेक्षा अशा रचनांना बोलकविता म्हटलेले उत्तम नाही का? कशाला गझल ह्या लेबलाचा हट्ट धरायचा.

चित्तरंजन,
तुम्ही आशयाबद्दल ते वाक्य बोलला नाहीत हे माहीत होते. पण, कुणाचा गैरसमज होवू नये म्हणून मी विचारले.
लयीबद्दल म्हणाल तर वाद संभव आहे. मी इतर कोणाचीही उदाहरणे देणार नाही. कारण त्यांच्या लिखाणावर माझे लिखाण अवलंबून नाही.
पण तुमच्या मात्रावृत्तातल्या ह्या गझलेत लय जाणवत नाही. त्यापेक्षा अशा रचनांना बोलकविता म्हटलेले उत्तम नाही का? कशाला गझल ह्या लेबलाचा हट्ट धरायचा.
सर्वच तर तुमच्या हातात आहे या संकेतस्थळाचे. तुम्हीच ही गझल की काय ते विचाराधीनमध्ये का नाही टाकलेत ? अजूनही वेळ गेलेली नाही. तुमच्यामते ही "बोलकविता" असेल तर ती "विचाराधीन"मध्ये टाका की..!

** माझ्यामते ही गझल चांगली जमली आहे. मात्र इथे लिहिण्याचा आता विचारच करावा लागेल असे दिसते.

मी या संकेतस्थळावर कुणीही अधिकारी नाही याची नम्र जाणीव ठेवून फक्त मनात आले म्हणून असे मत मांडतो की गझलांवरील प्रतिसाद हे कन्स्ट्रक्टिव्ह (मराठी पर्याय लक्षात आला नाही) होतील असे सगळ्यांनी बघितल्यास फार उत्तम होईल असे वाटते. (कदाचित माझ्याकडूनच हे विधान होणे हास्यास्पदही समजले जाऊ शकेल.)

अजयराव,

कृपया गैरसमज नसावा, पण चित्तरंजन आशयाबाबत बोललेले नाहीत हे त्यांनी लिहिले. त्यानंतर 'का टाकत नाही विचाराधीनमधे' या प्रश्नातून कदाचित इतकेच साध्य होत असावे की 'मात्रा परफेक्ट असल्या की गझलतंत्रातील रचना ही गझल ठरायला हवी'. पण माझ्यामते तरीही लय ही गझलेची सुरुवात आहे व ती अत्यंत महत्वाची आहे. आपल्या लयीतील अनेक उत्कृष्ट रचना आहेत व त्यावर सर्वांनी उत्स्फुर्त दादही दिलेली आहे. पण या गझलेत लय नाही असे वाटल्यावर त्यावरही चर्चा होणार असे वाटते. खरे तर चित्तरंजन यांनी दाद देण्यासाठी व लयीबाबत बोलण्यासाठी वेगवेगळे प्रतिसाद दिले यातूनच त्यांना एकंदर लयहीन गझलांबाबत बोलायचे होते असे मला वाटले.

असो. मी मधे घुसून फार (नेहमीप्रमाणेच) बोललो याबद्दल क्षमस्व!

चल, करूया गुंठेवारी मनाची,
अन् मला कुठे करता भांडण येते...?

अजयरावांचा हा शेर आपणा तिघांच्या चर्चेवर माझा प्रतिसाद आहे.

डॉ.कैलास

कैलासराव,

आपल्याला मते स्वच्छ शब्दात मांडता येतीलच! अजयरावांचा शेर त्यासाठी उल्लेखण्याची कितपत आवश्यकता आहे हे मला कळले नाही.

असो.

धन्यवाद!

गझलेची बाराखडी आणि ''कैफियत'' मधिल गझलेच्या व्याख्येनुसार,
''एकाच वृत्तातील्,एकच यमक व अंत्ययमक असलेल्या प्रत्येकी २/२ ओळींच्या किमान ५ किंवा त्यापेक्षा अधिक कवितांची बांधणी'' म्हणजे गझल होय.

यास्तव वरील रचना ही निश्चित्पणे गझल आहे.
परंतु ''त्यातिल आशय मनाला भिडतो'', '' रचना लयीत म्हणता येते'',हे गझल प्रभावी किंवा हिट होण्यासठी आवश्यक बाबी आहेत.......

''मात्र वरील बाबी ( ज्या व्यक्ती सापेक्ष बदलू शकतात ),नसल्या तरीही ती रचना गझलच रहाते.....बोलकविता (च) नाही.
यास्तव अजयरावांची ही रचना गझल निश्चित आहे....परंतु अशा कसलेल्या शायराकडून जेव्हा लयीत बोलता येत नसणारी
रचना येते तेव्हा त्याबद्दल चित्तरंजन यांनी दिलेला प्रतिसाद ठळकपणे जाणवतो......ह्यात आपणाकडून अधिक चांगली रचना यावी हेच अपेक्षित आहे....

चित्तरंजन यांचा प्रतिसाद सकारात्मक रित्या घेउन अजय राव्,आपण टोकाची भूमिका न घ्यावी असे वाटते.

म्हणून माझा प्रतिसाद होता....

चल, करूया गुंठेवारी मनाची,
अन् मला कुठे करता भांडण येते...?....हे बेफिकिर यांस.

डॉ.कैलास

कैलास,
प्रथम धन्यवाद. यासाठी की, माझ्या ओळी तुम्हाला प्रसंगानुरूप वाटल्या.

बेफिकीर,
त्यानंतर 'का टाकत नाही विचाराधीनमधे' या प्रश्नातून कदाचित इतकेच साध्य होत असावे की 'मात्रा परफेक्ट असल्या की गझलतंत्रातील रचना ही गझल ठरायला हवी'.
हे तुमचे म्हणणे योग्य नाही. चित्तरंजन यांनी इतके साधे विधान केलेले नाही. पहा...
पण तुमच्या मात्रावृत्तातल्या ह्या गझलेत लय जाणवत नाही. त्यापेक्षा अशा रचनांना बोलकविता म्हटलेले उत्तम नाही का? कशाला गझल ह्या लेबलाचा हट्ट धरायचा.
या विधानावर मी माझा विचार दिलेला होता. त्यामुळे, त्यांना एकंदर लयहीन गझलांबाबत बोलायचे होते असे मला वाटले. हे तुमचे विधान चुकीचे ठरतेच.

मुळातच, या गझलेत सर्व शेरांत एकसारखी लय सापडत नाही हे मलाही माहीत आहे. त्यासाठी इतरांची आवश्यकता नाही. म्हणूनच तुमच्या पहिल्या प्रतिसादावर मी काहीही बोललो नव्हतो. परंतु, चित्तरंजन यांच्या...
नुसत्याच मात्रा मोजून गझलेच्या ओळी लिहू नयेत. अर्थात हे पुन्हा पुन्हा सांगून फायदा होतोच असेही नाही.
या विधानांचा अर्थ काय समजायचा? यामुळे वाचकांचा फक्त इतकाच गैरसमज होवू शकतो की चित्तरंजन हे अजय अनंत जोशी यांना याबद्दल सतत सांगत असतात तरी हे तसेच लिहितात. असाच होईल की नाही..?
शेर हा बोलण्यासाठी नसावा का?
यावर चित्तरंजन यांनी वरील गझल बोलकविता आहे असे म्हटले आहे. या संकेतस्थळाचे सर्वाधिकार त्यांच्याच कक्षेत येतात. शेर बोलल्यासारखा यावा असे भटांनीही म्हटले आहे. म्हणजे अक्षरगणवृत्तात लिहू नये असे मी म्हणत नाही.
गझलेत लय नाही हे विधानही चुकीचे आहे. सर्वत्र सारखीच लय नाही हे खरे.
असो. चर्चा न संपणारी.

पुन्हा कैलास,
तुमचा दृष्टीकोन चांगला आहे. मात्र सकारात्मक आणि अधिकारात्मक या दोन गोष्टी भिन्न आहेत.

चित्तरंजन,
गझल लयीत असावी हे मलाही माहीत आहे. तुमचे म्हणणे चुकीचे नाही. मात्र मांडण्याची पद्धत निश्चितच चुकीची आहे.

धन्यवाद.

"नुसत्याच मात्रा मोजून गझलेच्या ओळी लिहू नयेत. अर्थात हे पुन्हा पुन्हा सांगून फायदा होतोच असेही नाही." हे केवळ अजय अनंत जोशी ह्यांना पुढे ठेवून लिहिलेले नव्हते. गैरसमज झाला असल्यास खेद आहे.

धन्यवाद चित्तरंजन.

जिथे जावे सरळ, तिथे वळण येते
खुप छान.
हा अनुभव सर्वांनाच प्रत्येक सरळ रस्त्यावर येतो.
अप्रतिम मांडणी.

"सर्वत्र सारखीच लय नाही हे खरे."
या माझ्या विधानाचा इतर अर्थ काढू नये. इथे "लय" म्हणजे वरच्या ओळीतील लघु-गुरू क्रम आणि खालच्या ओळीतील क्रम यात थोडा फरक आहे इतकेच.
मात्र म्हणताना म्युझिकदृष्ट्या "लय" सारखीच आहे ... आणि अतिशय उत्कृष्टपणे म्हणता येते. चित्त, आणि बे यांच्या मुद्द्यांनंतर मी पुन्हा पुन्हा म्हणून पाहिले.

अनिल,
धन्यवाद...!

अजयराव,

ही चर्चा चांगली की वाईट झाली हा एक वेगळाच विषय आहे. पण दोन कारणांसाठी, एक म्हणजे राहवत नाही म्हणून व दुसरे म्हणजे मला काही विचार अजिबातच पटले नाहीत म्हणून मी पुन्हा यावर मत द्यायचे ठरवत आहे. आपली खालील विधाने:

लय ही भावनांची असावी - हे विधान 'गझलेच्या लयीवर चर्चा चाललेली असताना' अनावश्यक वाटले. आपल्या सदर गझलेत भावनांची लय आहे हे कृपया दाखवावेत अशी विनंती! तसेच, ती असलीच तरी त्याचा अर्थ 'गझलेला लय नसली तरी चालेल' असे नाही. आपण 'लय' या विषयावर केलेली वरील चर्चा कदाचित काही नवीन लोकांना (मी हल्ली मला जुना समजायला लागलो आहे ही चूक मान्य करतो) बुचकळ्यात पाडेल.

शेर हा बोलण्यासाठी नसावा का? फक्त गाण्यासाठीच असावा का..?

एखादी गझल गेय नसणे व एखादी गझल गेय असणे ही विधाने पटत नाहीत. मात्रावृत्ते व गणवृत्ते यातील काहीही योजले तरीही 'प्रत्येक, गझल गेय असते'. ती 'गायनानुकूल' आहे की नाही यावर मतभेद असू शकतात. (गेय - संगीतात गणिताप्रमाणे परफेक्ट बसेल अशी व गायनानुकुल म्हणजे गीत स्वरुपात सादर करण्यासारखा गझलेचा आशय आहे की नाही यावरून ठरणे.) शेर हा बोललाच जातो. गायलाही जाऊ शकतो, पण ऐतिहासिकरीत्या बहुतांशी तो बोललाच जातो. प्रत्येक गझल गेय असते कारण सर्व ओळींच्या मात्रा समान, (लगक्रम समान असल्यास तोही) व सर्व ओळींची लय समान (व लय समान येणे हे नैसर्गीकच असते, त्यासाठी खास प्रयत्न करावे लागत नाहीत, लय बिघडवण्यासाठी, सर्व ओळीत वेगवेगळी लय घेण्यासाठी कदाचित खास प्रयत्न करावे लागत असावेत की काय असे वाटते. ) असते. शेर हा बोलण्यासाठी असला तरीही लयीत उच्चारता यायलाच हवा. मीही आपल्या या गझलेच्या ओळी आणखीन काही वेळा उच्चारून पाहिल्या. पहिल्या मिसर्‍याप्रमाणे दुसरा मिसरा वाचता आला नाही.

माझ्यामते ही गझल चांगली जमली आहे. मात्र इथे लिहिण्याचा आता विचारच करावा लागेल असे दिसते.

ही गझल चांगली असूनही येथे लिहिण्याचा मात्र विचार करावा लागेल या विधानासाठी आपण आधार घेतला आहेत तो आपल्याच स्वतःच्या मताचा! हे कितपत समर्थनीय ठरावे?

मुळातच, या गझलेत सर्व शेरांत एकसारखी लय सापडत नाही हे मलाही माहीत आहे. त्यासाठी इतरांची आवश्यकता नाही

एकसारखी लय एका गझलेच्या सर्व शेरात असायला हवी या मताचा मी आहे.

"सर्वत्र सारखीच लय नाही हे खरे."
या माझ्या विधानाचा इतर अर्थ काढू नये. इथे "लय" म्हणजे वरच्या ओळीतील लघु-गुरू क्रम आणि खालच्या ओळीतील क्रम यात थोडा फरक आहे इतकेच.

वरच्या व खालच्या ओळीतील लघु गुरू क्रम 'थोडा किंवा भरपूर' वेगळा असणे याला मात्रावृत्त असेच म्हणणार ना? मग मात्रावृत्तात आपली गझल आहे हे सर्वांना मान्य आहेच की? मुद्दा असा आहे की मात्रावृत्तातही एका लयीत ओळी म्हणता आल्याच पाहिजेत. उदाहरण म्हणून मी माझे हे शेर देतो.

यातूनच माझे दैव सदा घडलेले
जे रस्त्यावरती ओवाळुन पडलेले

का सुखशय्येची नीज मला भावेना
हे कुठल्या वेश्येवरती मन जडलेले?

तू पूर्णपणे गेलास विसरुनी की मग
तेव्हा मिळते केव्हाचे आवडलेले

पहिल्या शेरात ठळक केलेल्या अक्षरांच्या जागीच इतर शेरात असलेली अक्षरे 'हळू / जोरात' (अनुक्रमे) उच्चारली जात आहेत हे आपण अनुभवू शकालच!

मात्र म्हणताना म्युझिकदृष्ट्या "लय" सारखीच आहे ... आणि अतिशय उत्कृष्टपणे म्हणता येते

हेही आपलेच मत आहे! ते खोडून काढत बसणे हा वादासाठी वाद होईल.

एकंदरः

*गणवृत्त वा मात्रावृत्तातील गझलेच्या सर्व ओळी एकाच लयीत म्हणता यायला हव्यात

*भावनांची लय अशी कोणतीही संज्ञा गझलेच्या उच्चारावेळच्या लयीला पर्याय असू शकत नाही

*शेर गद्य पद्धतीने उच्चारला तरीही लयीत उच्चारता यायला हवा.

माझ्याकडून यावरचा हा प्रतिसाद शेवटचा! चर्चेत पुन्हा ओढून घेतले गेल्यास माहीत नाही.

जरी बेताल मी, माझी गझल तालात चालावी
सदा रंगीन वाटावी, तिन्ही कालात चालावी

-'बेफिकीर'!

ही गझल विचाराधीन केल्याबद्दल विश्वस्तांचे आभार..!

पुन्हा पुन्हा लिहिल्याबद्दल मनापासून माफी मागतो.

चर्चेने एकंदरीत कडवट वळण घेतलेले दिसले.

ही रचना विचाराधीन होण्याचे कारण कृपया स्पष्ट झाल्यास बरे वाटेल. कारण त्यामुळे कदाचित गझल लयीवरून विचाराधीन होण्याचा एक पायंडा पडेल, जो योग्य अयोग्य कसा असेल यावर बोलण्याचा माझा अधिकार नाही. मात्र आत्तापर्यंत असे झाले नव्हते असे मला स्मरते.

चु.भु.द्या.घ्या.

खूप प्रयत्न करूनही जी गझल नीट लयीत वाचता येत नाही ती विचाराधीन/अप्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ह्यापूर्वीही अशा काही गझला प्रकाशित झाल्या आहेत. अशा गझलाही विचाराधीन करण्यात येतील. अशा गझला आढळल्यास सांगावे.