अजूनही

ठाव ना तुझा तुला अजूनही
काय शोधसी मला अजूनही?

जागल्या कळ्या; सुकून चालल्या,
गंध मात्र राहिला अजूनही

ओळखू कसा तुझा स्वभाव रे?
जाणले न मी मला अजूनही

लांब जात सावल्याहि पांगल्या
तू दिवा न लावला अजूनही

सावळा न राधिका, न गोपिका
एकटा रिता झुला अजूनही

मीच जिंकले तरी हरायचा
डाव का न संपला अजूनही?

तोच नांदतो म्हणे चराचरी
का मला न भेटला अजूनही?

गझल: 

प्रतिसाद

कळ्या, स्वभाव  हे शेर  आवडले.
तोच नांदतो म्हणे चराचरी
का मला न भेटला अजूनही?

यावरून  'जयंता' यांचा  हा  शेर  आठवला-
'तो' म्हणे  सर्वत्र  आहे..
शोधणे  चुकले  असावे.

पुलेशु.

शेर आवडला
लांब जात सावल्याहि पांगल्या
तू दिवा न लावला अजूनही

गझल आवडली. सगळेच शेर छान आहेत. पण झुला, सावल्या, गंध विशेष. लिहीत राहा.

भन्न्नाट
तोच नांदतो म्हणे चराचरी
का मला न भेटला अजूनही?

तोच नांदतो म्हणे चराचरी
का मला न भेटला अजूनही?
वा वा!,
मस्त . गझल आवडली.
सोनाली

ओळखू कसा तुझा स्वभाव रे?
जाणले न मी मला अजूनही      व्वा!
तोच नांदतो म्हणे चराचरी
का मला न भेटला अजूनही?    खरेच आहे.
कलोअ चूभूद्याघ्या

ठाव ना तुझा तुला अजूनही
काय शोधसी मला अजूनही? - छान!

जागल्या कळ्या; सुकून चालल्या,
गंध मात्र राहिला अजूनही - चांगला

ओळखू कसा तुझा स्वभाव रे?
जाणले न मी मला अजूनही - सुरेख

(काय शोधसी मला अजूनही?
जाणले न मी मला अजूनही



ओळखू कसा तुझा स्वभाव रे?
ठाव ना तुझा तुला अजूनहीअसेही शेर होऊ शकतात. असे पहिल्यांदाच जाणवले. छान!)

सावळा न राधिका, न गोपिका
एकटा रिता झुला अजूनही - चांगला

तोच नांदतो म्हणे चराचरी
का मला न भेटला अजूनही? - नेहमीचा तरीही अभिव्यक्ती चांगली!शुभेच्छा व अभिनंदन!( एक सहज आवाहन करत आहे. 'भेट एकदा तरी मला' असा मतल्यातील मिसरा घेऊन एक गझल करावीत. कारण आपल्याकडे चांगले

बरेच काही आहे असे जाणवते. 'तरी / खरी वगैरे काफिये अन 'मला' ही रदीफ! सहज विनंती करत आहे, त्यात काही कृपया गैर मानू नयेत.)

ही रचना छानच आहे.