पुनर्भेट

==================

चालला  तुझा  नवा  बनाव  आजही
राहिला  तसाच  का  स्वभाव  आजही?

फैर  झाडतेस  तू  सरावल्यापरी
तोकडाच  आमचा  बचाव  आजही..

मी  मनातल्या  मनात  बोललो  मला-
"केवढा  तरी  हिचा  प्रभाव  आजही !"

खेटुनी  बसायला  नकोच  एवढे,
पाहतो  दुरून  हा  जमाव  आजही

दोन  चुंबके  जणू  समोर  ठेवली
आपल्यामधे  असा  तणाव  आजही

या  घरात  एकटे  न  वाटले  कधी,
नांदतो  इथे  तुझा  अभाव  आजही !

शेवटी  हरून  चोरलीस  ना  नजर?
लागला  कुठे  तुझा  निभाव  आजही..

एवढी  गुणी  बनू  नकोस  ना  सखे,
छेड  आजही, मला  सताव  आजही..

फायदा  किती  करून  देतसे  मला,
एकटे  रडायचा  सराव  आजही...

काय  आपल्यात  जे  टिकून  राहिले?
काय  आपल्यात  बेबनाव  आजही?

भेट  ही  अशी  विरून  जायला  नको..
मर्म  कोणतेतरी  दुखाव  आजही !

 

 

-ज्ञानेश.
==================

गझल: 

प्रतिसाद

दोन  चुंबके  जणू  समोर  ठेवली
आपल्यामधे  असा  तणाव  आजही -- वा!
या  घरात  एकटे  न  वाटले  कधी,
नांदतो  इथे  तुझा  अभाव  आजही ! -- नेहमीचीच बात पण किती सुंदर मांडलयस!!
शेवटी  हरून  चोरलीस  ना  नजर?
लागला  कुठे  तुझा  निभाव  आजही.. -- अतिशय गोड शेर!
खेटुनी  बसायला  नकोच  एवढे,
पाहतो  दुरून  हा  जमाव  आजही  -- मस्त चिमटा घेणारा शेर.
तुलनेत मतला, बचाव आणि सराव थोडे फिके वाटले. "दुखाव" शब्द खटकला.
गझल फार आवडली!

दोन  चुंबके  जणू  समोर  ठेवली
आपल्यामधे  असा  तणाव  आजही.. वा सही शेर.. उत्तम कल्पना

भेट  ही  अशी  विरून  जायला  नको..
मर्म  कोणतेतरी  दुखाव  आजही !.. मस्तच!
-मानस६

दोन चुंबके - हा शेर खूप आवडला.

या  घरात  एकटे  न  वाटले  कधी,
नांदतो  इथे  तुझा  अभाव  आजही !
शेवटी  हरून  चोरलीस  ना  नजर?
लागला  कुठे  तुझा  निभाव  आजही..
एवढी  गुणी  बनू  नकोस  ना  सखे,
छेड  आजही, मला  सताव  आजही..
व्वा! सुंदर.
कलोअ चूभूद्याघ्या

दोन  चुंबके  जणू  समोर  ठेवली
आपल्यामधे  असा  तणाव  आजही
वावाव्वा!

या  घरात  एकटे  न  वाटले  कधी,
नांदतो  इथे  तुझा  अभाव  आजही !
व्व्वा!

चित्त यांच्याशी सहमत. वरील दोन शेर फार आवडले.

दोन  चुंबके  जणू  समोर  ठेवली
आपल्यामधे  असा  तणाव  आजही
या  घरात  एकटे  न  वाटले  कधी,
नांदतो  इथे  तुझा  अभाव  आजही !
फायदा  किती  करून  देतसे  मला,
एकटे  रडायचा  सराव  आजही...
काय  आपल्यात  जे  टिकून  राहिले?
काय  आपल्यात  बेबनाव  आजही?
अप्रतिम शेर !

सगळे शेर आवडले.
फायदा  किती  करून  देतसे  मला,
एकटे  रडायचा  सराव  आजही...
काय  आपल्यात  जे  टिकून  राहिले?
काय  आपल्यात  बेबनाव  आजही?
भेट  ही  अशी  विरून  जायला  नको..
मर्म  कोणतेतरी  दुखाव  आजही !
अप्रतिम....!!

स....ग....ळे शेर आवडले..
प्रत्येक शेरात काहीतरी वेगळं आहे... आणि काही 'वेगळं' सापडलं नाही तरी
अर्थाची छटा वेगळी आहेच... :-)
 
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!

दोन चुंबके जणू समोर ठेवली
आपल्यामधे असा तणाव आजही
ज्ञानेश मस्तच रे. अप्रतिम केवळ.

फैर झाडतेस तू सरावल्यापरी
तोकडाच आमचा बचाव आजही..

व्वा!

वा. पुन्हा एकदा वाचताना वेगळी मजा आली. पुनर्भेटीचा आनंद वेगळा.

मी मनातल्या मनात बोललो मला-
"केवढा तरी हिचा प्रभाव आजही !"

मस्त गझल !