तुझ्या नि माझ्या भेटीचे युग...

तुझ्या नि माझ्या भेटीचे युग जरी संपले आहे
मनात माझ्या फिरुन जुने ते वादळ उठले आहे


तुझ्यासारखी मी ही केली कुजबुज एकांताशी
मधुर स्मृतींनी एकांताला पुन्हा रडवले आहे


नेहमीच मज तुझी सांत्वना जगण्याचे बळ देते
अन्यथा व्यथांनी मनास पुरते गुरफटले आहे


जरा न मन मोहरले माझे, फक्त शहारा आला
वसंत किंवा शरद नसे हा, मळभ दाटले आहे


गंध नसे वार्‍याला तो कोरडा वाहतो आता
गाव तुझे त्याच्याही पासुन दूर चालले आहे


काळजास उसवुन बघतो तर अमाप खस्ता तेथे
कुठे-कुठे धागे ओवू... आयुष्य फाटले आहे


                                      - जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५.  भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८

गझल: 

प्रतिसाद

पहीला व शेवटचा शेर फारच आवडला.आणखी रचना येउ देत.

तुझ्या नि माझ्या भेटीचे युग जरी संपले आहे
मनात माझ्या फिरुन जुने ते वादळ उठले आहे  
वाव्वा !  हा मतला फार आवडले. एकंदर गझल छान आहे. 

तुझ्यासारखी मी ही केली कुजबुज एकांताशी
मधुर स्मृतींनी एकांताला पुन्हा रडवले आहे

नेहमीच मज तुझी सांत्वना जगण्याचे बळ देते
अन्यथा व्यथांनी मनास पुरते गुरफटले आहे

जरा न मन मोहरले माझे, फक्त शहारा आला
वसंत किंवा शरद नसे हा, मळभ दाटले आहे

सांत्वना आवडली.......