सांगती खोटे जरी


सांगती खोटे जरी सारीच पाने,
ग्रंथ येथे थोर ठरतो वेष्टनाने


सांग, शब्दांनी कसे मी सर्व सांगू?
काळजाला ओळखावे काळजाने


पाखरू सोसेल ही बंदी,परंतू
गीत मुक्तीचे न गावे पिंजऱ्याने


सर्व ते गेले सुखाच्या मैफलीला
गायिली माझी व्यथा मी एकट्याने


"का तुझी -माझी अशी ही भेट झाली?"
-हे न काट्याला पुसावे पावलाने

             दिलीप पांढरपट्टे

 

 

 

गझल: 

प्रतिसाद

    सगळेच शेर उत्तम आहेत.

"का तुझी -माझी अशी ही भेट झाली?"
-हे न काट्याला पुसावे पावलाने

क्या बात है!!

दिलीपराव,  या संकेतस्थळावर  तुमचे मनापासून स्वागत...!
ही गझल तर आवडलीच...पण तुम्ही यापूर्वी  येथे सादर केलेल्याही गझला आवडल्या. 
शुभेच्छा...!

पिंजरा आणि काटयाचा शेर अप्रतिम!!

खूपच सुंदर गझल! पहिल्या शेरापासून ते शेवटच्या शेरापर्यंत एक से एक बढकर शेर!
सांगती खोटे जरी सारीच पाने,
ग्रंथ येथे थोर ठरतो वेष्टनाने
पाखरू सोसेल ही बंदी,परंतू
गीत मुक्तीचे न गावे पिंजऱ्याने
हे दोन तर विशेषच आवडले. छान गझल दिल्याबद्दल धन्यवाद!
-सतीश

"का तुझी -माझी अशी ही भेट झाली?"
-हे न काट्याला पुसावे पावलाने

वा!! मस्त शेर

तुमच्या गझल तर नेहमीच भावतात..

पाखरू सोसेल ही बंदी,परंतू
गीत मुक्तीचे न गावे पिंजऱ्याने

"का तुझी -माझी अशी ही भेट झाली?"
-हे न काट्याला पुसावे पावलाने

क्या बात है..