नियम

जीवनाचे (/ लेखनाचे) नियम सारे मोडले मी
शब्द जे रिझवीत गेले, जोडले मी!


सोडुनी घरटी जुनी पक्षी उडाले...
जीर्ण वृक्षाला तरी ना सोडले मी...


राहिला आता कुठे संदर्भ त्यांचा?
धर्मग्रंथांतील दावे खोडले मी!


कळत-नकळत मी कसा बोलून गेलो!
गुपित जपलेले चुकीने फोडले मी...


यायचा समजावण्यासाठी मला तो...
बोलणे त्याचे मधे का तोडले मी?


- कुमार जावडेकर, मुंबई

गझल: 

प्रतिसाद

सोडुनी घरटी जुनी पक्षी उडाले...
जीर्ण वृक्षाला तरी ना सोडले मी...

छान. हा शेर विशेष आवडला (का कोण जाणे, शिवसेना/बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंधित वाटला (हलकेच घ्या))
गुपित फोडणेही आवडले.

कुमार,

गझल आवडली.
सोडुनी घरटी जुनी पक्षी उडाले...
जीर्ण वृक्षाला तरी ना सोडले मी...
वा!
कळत-नकळत मी कसा बोलून गेलो!
गुपित जपलेले चुकीने फोडले मी...
वा! वा! वरची ओळ फारच छान. शेर मस्त.
कधी कधी एका ओळीतच शेर संपून जातो. म्हणजे ती ओळच एवढी छान असते. 'एक मिसरे का मसला' !
मतला पुन्हापुन्हा वाचल्यावर जे शब्द रिझवीत जातात त्यांना जोडणे, ह्याला नियम तोडणे म्हणतात का? असा प्रश्न माझ्या मनात आला.  तुम्हाला काय वाटते?
मक्ताही अगदी मनातले बोलणारा आहे.
यायचा समजावण्यासाठी मला तो...
बोलणे त्याचे मधे का तोडले मी?
वाव्वा! मस्त.

कळत-नकळत मी कसा बोलून गेलो!
गुपित जपलेले चुकीने फोडले मी...

यायचा समजावण्यासाठी मला तो...
बोलणे त्याचे मधे का तोडले मी?
कुमार, अतिशय छान शेर...लिहीत राहा, मित्रा...!
 

गझल आवडली. मतल्याविषयी चित्तरंजनाने उपस्थित केलेली शंका मलाही आली. त्याच्या अनुषंगाने एक बदल सुचला :

वाड्.मयाचे नियम सारे मोडले मी
शब्द जे रिझवीत गेले, जोडले मी!

कळत-नकळत आणि मक्ता मस्त आहे.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद !
मिलिंदपंत,
वाड्.मयाचे  किंवा लेखनाचे  हा शब्द आशयाच्या दृष्टीनं योग्य वाटतो हे खरं; पण प्रत्येक ठिकाणी (उदा. लेखन, वाहन इ.) नियम जरी वेगळे असले तरी त्यांचा आवाका फक्त लेखनापुरते मर्यादित नसतो, (जो माणूस नियम पाळतो, ते लेखनाचे, आणि इतरही), ते जीवनासाठी असतात असा व्यापकपणा  आणायचा प्रयत्न होता.
याचं दुसरं अधिक समर्पक उदाहरण एकदा उर्दू शायर संदीप गुप्ते यांनी दिलं होतं.
होशवालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है
इश्क कीजे फिर समझिये जिंदगी क्या चीज है
इथे निदा फाजलींना जिंदगी ऐवजी आशिकी किंवा मौशुकीही वापरता आला असता. पण त्यांनी जिंदगी लिहून शेराची कक्षा वाढवली.
चक्रपाणि,
ठाकरे अप्रतिम... मलाही सुचले नव्हते... पण पटले. मी तो शेर एका परिकथेवरून (हॅपी प्रिन्स.. ऑस्कर वाइल्ड किंवा अंडरसन) लिहिला होता...
- कुमार

जीवनाचे (/ लेखनाचे) नियम सारे मोडले मी
शब्द जे रिझवीत गेले, जोडले मी!

कुमार,
सर्वप्रथम, शेरात असं "/ " वापरून दोन शब्द देऊन वाचकांनी त्या दोन्ही अर्थांनी शेर समजून त्याचा आस्वाद घ्यावा असे सुचवायचे ही भूमिका मला पटत नाही. हे नियमात बसतं असंही वाटतं नाही. एकाच शब्दातून वा ओळीतून अनेक अर्थ व्यक्त करणे, सुचवणे महत्त्वाचे. अन्यथा शेरातील प्रत्येक शब्दास असा एक किंवा अनेक पर्याय कवी देऊ लागला तर ती ओळ न होता मालगाडी होईल. इथे तुम्हाला "जीवन" हा व्यापक दृष्टिकोन ठेवायचा असेल तर मग "लेखनाचे" गाळायला हवा.
"जीवनाचे नियम सारे मोडले मी" असं लिहिल्यास पुढल्या ओळीतील "शब्द" हा शब्द व्यापक परिमाणास अचानक संकुचित करतो. त्याच्या जागी दुसरी काहीतरी, अधिक परिणामकारक ,अर्थ आकुंचित न करणारी शब्दयोजना हवी. उदा.
"जे जसे रिझवीत गेले, जोडले मी" (घाईत याहून बरं काही सुचलं नाही!)
आणि जर "माझ्या लेखनाने मी जीवनाचे सारे नियम मोडले" असं तुम्हाला म्हणायचं असेल तर तो अर्थ परिणामकारकरीत्या समोर येत नाही.

होशवालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है
इश्क कीजे फिर समझिये जिंदगी क्या चीज है
या तुम्ही उदाहरणादाखल दिलेल्या शेरात इश्क व इश्क केल्याने आयुष्यात येणारी बेखुदी यांचा जसा मेळ घातला आहे तसा मेळ रिझवणार्‍या शब्दांचा व जीवनाचे नियम मोडण्याचा होताना दिसत नाही.

ता. क.  "पंत", "राव", "जी" इत्यादी मनोगती लागण या संकेतस्थळावर नाही आणली तर नाही का चालणार ? ;)

इथे तुम्हाला "जीवन" हा व्यापक दृष्टिकोन ठेवायचा असेल तर मग "लेखनाचे" गाळायला हवा.
"जीवनाचे नियम सारे मोडले मी" असं लिहिल्यास पुढल्या ओळीतील "शब्द" हा शब्द व्यापक परिमाणास अचानक संकुचित करतो. त्याच्या जागी दुसरी काहीतरी, अधिक परिणामकारक ,
अर्थ आकुंचित न करणारी शब्दयोजना हवी. उदा.
"जे जसे रिझवीत गेले, जोडले मी" (घाईत याहून बरं काही सुचलं नाही!)
आणि जर "माझ्या लेखनाने मी जीवनाचे सारे नियम मोडले" असं तुम्हाला म्हणायचं असेल तर तो अर्थ परिणामकारकरीत्या समोर येत नाही.

अगदी हेच वाटते. सुचवलेला बदलही आवडला. कुमारनी 'जीवनाचे/लेखनाचे' असा दिलेला पर्याय हा इथल्यापुरता मर्यादित असावा. काव्यसंग्रहात ते तसे करणार नाहीत असे वाटते. 

गझल आवडली.

सोडुनी घरटी जुनी पक्षी उडाले...
जीर्ण वृक्षाला तरी ना सोडले मी...
गझल आवडली

मिलिन्द / चित्त,
'लेखनाचे' हा पर्यायी शब्द म्हणून मी लिहिला होता; 'जीवनाचे'चं स्पष्टीकरण म्हणून नव्हे.
पण 'जे जसे..' (किंवा तत्सम) बदल पटला! कवितासंग्रहात एकच शब्द ठेवला आहे.
- कुमार
ता. क. मिलिन्द, यापुढे या संकेतस्थळावर पंत/राव/जी माफ!... (चंद्र कसा वाटतो? उदा. शरदचंद्ररावजी इ. नाहीतरी कवीला चंद्र प्यारा असतोच!.... ह. घ्या.)

सोडुनी घरटी जुनी पक्षी उडाले...
जीर्ण वृक्षाला तरी ना सोडले मी...
क्या बात है कुमारशेठ! हॉटेल मालवण मध्ये ही गझल आपण मला ऐकवली होती! ;)
तात्या.

आयुष्याचे नियम सारे मोडले मी,
क्षण जे रिझवीत गेले, जोडले मी!
कुमार, बघा हे कसं वाटतं . बाकी कवीता एकदम touchable!
 
 
 
 

निलय,
तुम्ही सुचवलेला बदल आशयाच्या दृष्टीनं चांगला आहे; पण वृत्त-नियमांत बसत नाही
- कुमार