कसा मी करावा खुलासा मनाचा...

कसा मी करावा खुलासा मनाचा
कुठे भरवसा आज आहे कुणाचा

भला हा जमाना भली माणसे ही
भला डाव आहे भुरळ पाडण्याचा

जरा लाभता मज इथे सौख्य साधे
जगा दु:ख आहे तया टाळल्याचा

जपा रोज तुम्ही इथे गारगोट्या
मला वेध आहे खर्या मानकाचा

तुला पाहताना असे वाटते की
मला लाभला चेहरा माणसाचा

कुठे शोधतो तू जगाचा नकाशा?
जरा शोध घे रे मनाच्या तळाचा

असे सत्य हे की कुणा ना कळाले
कसा अंत होतो इथे जीवनाचा

भिजू दे मला तू अता आसवांनी
कुठे भरवसा राहिला पावसाचा

मुक्या भावनेला मुके ठेव आता
अबोली जसा गंध ठेवी स्वत:चा

...........विद्यानंद हाडके

गझल: 

प्रतिसाद

तुला पाहताना असे वाटते की
मला लाभला चेहरा माणसाचा

उत्तम शेर !
चांगली गझल, विद्याधरजी.

हडकेजी.. सुंदर गझल. आधी वाचलेली आहेच. पुन्हा वाचली.

भिजू दे मला तू अता आसवांनी
कुठे भरवसा राहिला पावसाचा

मुक्या भावनेला मुके ठेव आता
अबोली जसा गंध ठेवी स्वत:चा

खूप सुंदर!