स्मशानात जागा हवी तेवढी
स्मशानात जागा हवी तेवढी
कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?
पुन्हा आज होऊ नये तेच झाले, कशा थांबवाव्यात वाताहती?
हवेनेच केला जिथे कोंडमारा, तिथे प्राण जाणे टळावे कसे?
तुझा पिंड आहेच विश्वासघाती, तसा एक अंदाज आहे मला
तरी जीव गुंतून जातो तुझ्याशी, मनाचे पिसे कुस्करावे कसे?
जरी सत्य तू बोलतो मान्य आहे, परी त्यास आहे कुठे मान्यता?
सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे, पुरावे तुझे मान्य व्हावे कसे?
कशी एकटी हिंडते रानमाळी, जरी अर्धवेडी न भीते कुणा
तिला फ़क्त भीती जित्या माणसांची, पशूंना तिने घाबरावे कसे?
कसा व्यर्थ नाराज झालास आंब्या, वृथा खेद व्हावा असे काय ते
फ़ळे चाखण्याचेच कौशल्य ज्याला, तया ओलणे ते जमावे कसे?
शिवारात काळ्या नि उत्क्रान्तलेल्या खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
जिथे कुंपणे शेत खाऊन जाते, तिथे त्या पिकांनी लपावे कसे?
अभय काळजी त्या मृताची कशाला, स्मशानात जागा हवी तेवढी
समस्या इथे ग्रासते जीवितांना, विसावा कुठे अन् वसावे कसे..!
.
.
गंगाधर मुटे
………………………………………………………
प्रतिसाद
कैलास
शनि, 14/08/2010 - 20:32
Permalink
सुमंदारमालेवर मुटेजिंनी
सुमंदारमालेवर मुटेजिंनी प्रभुत्व मिळवलेलं दिसतंय....
चांगली गझल...
हवेनेच केला जिथे कोंडमारा, तिथे प्राण जाणे टळावे कसे?
जिथे कुंपणे शेत खाऊन जाते, तिथे त्या पिकांनी लपावे कसे?
या ओळी वाचताना ''ज्ञानेश''च्या
नभानेच ज्याचा असे घात केला,अशा पाखराने उडावे कुठे? ही ओळ आठवली.
कशी एकटी हिंडते रानमाळी, जरी अर्धवेडी न भीते कुणा
तिला फ़क्त भीती जित्या माणसांची, पशूंना तिने घाबरावे कसे?
हा शेर खूप आवडला.
खूप चांगली गझल मुटेजी.... लगे रहो...
डॉ.कैलास
गंगाधर मुटे
शनि, 14/08/2010 - 21:10
Permalink
धन्यवाद कैलासजी. नभानेच
धन्यवाद कैलासजी.
नभानेच ज्याचा असे घात केला,अशा पाखराने उडावे कुठे?
ती गझलच एवढी सुंदर आहे आणि त्यातल्या त्यात ही ओळ... त्यामुळे ... आठवण होतच राहणार.
गंगाधर मुटे
शनि, 14/08/2010 - 21:13
Permalink
……………………………………… खुरटणे = वाढ
………………………………………
खुरटणे = वाढ खुंटणे,
तण = पिकांत वाढणारे अनावश्यक गवत
ओलणे = ओलीत करणे,पाणी देणे
………………………………………
बहर
रवि, 15/08/2010 - 02:24
Permalink
मक्ता आवडला.. इतर शेरही..
मक्ता आवडला.. इतर शेरही.. ओलणे हा शब्द सर्रास वापरला जातो का? मला माहीत नाही. कृपया माहिती द्यावी. मतलाही मस्त झाला आहे. अजून एकदा वाचून परत प्रतिसाद देईन.
कैलास
रवि, 15/08/2010 - 09:54
Permalink
कसा व्यर्थ नाराज झालास
कसा व्यर्थ नाराज झालास आंब्या, वृथा खेद व्हावा असे काय ते
फ़ळे चाखण्याचेच कौशल्य ज्याला, तया ओलणे ते जमावे कसे?
या शेरात ओलणे वापरणे खूप आवडले.....
मुटेजी आपण काही शब्दांचे अर्थ दिलेत खरे..पण मला वाटतं हे शब्द कळण्यास अडचण नसावी इतके हे प्रचलित शब्द आहेत.
शुभेच्छा.
डॉ.कैलास
गंगाधर मुटे
रवि, 15/08/2010 - 10:37
Permalink
बहरजी,कैलासजी धन्यवाद. ......
बहरजी,कैलासजी
धन्यवाद.
........................
बहरजी,आमच्याकडे "पाणी वलायला गेला/जातो" असे म्हणतात.
वलणे हा ग्रामिण भाषेतला शब्द वल्हणे किंवा ओलणे या शब्दांशी जवळीक साधून असावा.
पण वल्हणे या शब्दाचा अर्थ "होडी चालवणे" अशा अर्थाने प्रचलीत आहे.
त्यामुळे वल्हणे या शब्दाचा अर्थ "पिकाला पाणी देणे" असा लावणे कठीण आहे.
वलणे = ओलणे = ओलीत करणे असाच असण्याची शक्यता आहे.
पिकाला पाणी देणे,झाडाला पाणी घालणे याला दुसरा काही पर्यायी शब्द असल्यास कृपया सांगावे.
काव्यरसिक
रवि, 15/08/2010 - 13:34
Permalink
वॄत्त हाताळणी अतिशय उत्तम
वॄत्त हाताळणी अतिशय उत्तम !
ज्ञानेशच्या गझलेची आठवण करून देणारी.
खालील ओळी सुरेखच ,
जरी सत्य तू बोलतो मान्य आहे, परी त्यास आहे कुठे मान्यता?
सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे, पुरावे तुझे मान्य व्हावे कसे?
----------------------------------------------------------------------------नचिकेत भिंगार्डे
कैलास
रवि, 15/08/2010 - 14:09
Permalink
मुटेजी, ''शिंपणे'' हा शब्द
मुटेजी,
''शिंपणे'' हा शब्द पर्यायी शब्द म्हणून वापरण्यास हरकत नसावी.
डॉ.कैलास
गंगाधर मुटे
रवि, 15/08/2010 - 21:03
Permalink
कैलासजी, "शिंपणे" "सिंचन
कैलासजी,
"शिंपणे" "सिंचन करणे" या शब्दातून स्पष्टपणे "पिकाला पाणी देणे" असा अर्थबोध नाहीच होत.
अनिल रत्नाकर
सोम, 16/08/2010 - 00:55
Permalink
उत्क्रान्तलेल्या खुज्या
उत्क्रान्तलेल्या खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
भन्नाट.
निलेश कालुवाला
सोम, 16/08/2010 - 14:28
Permalink
कसा जोम यावा खुरटल्या
कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?
मतला आवडला मुटेजी.(आमच्या गावी असलेल्या शेताचीही एकूण अशीच अवस्था.आपला मतला वाचून आठवण झाली.)
कशी एकटी हिंडते रानमाळी, जरी अर्धवेडी न भीते कुणा
तिला फ़क्त भीती जित्या माणसांची, पशूंना तिने घाबरावे कसे?
शिवारात काळ्या नि उत्क्रान्तलेल्या खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
जिथे कुंपणे शेत खाऊन जाते, तिथे त्या पिकांनी लपावे कसे?
हे दोन शेर दमदार झालेत.
ज्ञानेश.
मंगळ, 17/08/2010 - 12:14
Permalink
अतिशय सफाईदार आणि आश्वासक
अतिशय सफाईदार आणि आश्वासक वृत्त हाताळणी.
पहिले तीन शेर फार आवडले. शिवाय अनेक सुट्या ओळी आवडल्या.
पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
गंगाधर मुटे
गुरु, 19/08/2010 - 12:40
Permalink
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे .
चित्तरंजन भट
गुरु, 19/08/2010 - 12:41
Permalink
अतिशय सफाईदार आणि आश्वासक
ज्ञानेशरावांशी सहमत आहे.
गंगाधर मुटे
शुक्र, 20/08/2010 - 21:36
Permalink
चित्तरंजनजी, आभारी आहे.
चित्तरंजनजी, आभारी आहे.
ह बा
शनि, 21/08/2010 - 12:49
Permalink
सर्वच शेर आवडले... या
सर्वच शेर आवडले... या वृत्तातील गझल वाचताना मजा येते...
पाणी देणे : शेताकडं जाऊन येतो पाणी लावायचं आहे...
मळा जोजवणे (हे परभनीच्या एका कवी मित्राच्या कवीतेत वाचलं आहे)
गंगाधर मुटे
बुध, 25/08/2010 - 13:35
Permalink
धन्यवाद ह.बा.जी पाणी लावायचं
धन्यवाद ह.बा.जी
पाणी लावायचं आहे...
आणि
मळा जोजवणे
हे दोन्ही शब्द नविन आहेत माझ्यासाठी.