कोणत्या चिमटीत मी त्याला धरू

कोणत्या चिमटीत मी त्याला धरू
हिंडते मेंदूत जे फुलपाखरू

तू अता बघशील वाताहत खरी
लागले पाणी पुराचे ओसरू

गायही तेव्हाच पान्हा सोडते
लागते जेव्हा लुचाया वासरू

पटवती साऱ्या पुरातन ओळखी
कुठुन हे आले नवे माथेफिरू ?

खुळखुळाया लागले अश्रू किती !
केवढे लिहितोस तू गल्लाभरू

साठवू इतके सुगंधी सल कुठे ?
आठवू कोणास, कोणा विस्मरू ?

---------कलम 1-----------------

खूप नक्षीदार आहे शाल पण
एकमेकांनाच आता पांघरू

आपल्या दोघांमधे कोणी नको
ये मिठी नेसू, तिची वस्त्रे करू

पापण्यांनी चित्र ٌजे ऱेखाटले
रंग कुठले सांग ओठांनी भरू ?

ओठ, डोळे, केस, बाहू, हनुवटी
(हे करू की ते करू की ते करू)


1. उर्दू किंवा फारशी गझलेत कवीला एखादे मुक्तक (चार किंवा त्यापेक्षा जास्त ओळींचे) तर तेव्हा त्या ओळींच्या वर किंवा मध्ये किंवा दोन ओळींच्या मधल्या मोकळ्या जागेत तिथे क़ाफ़ हे चिन्ह ठेवून खालील ओळी ह्या एकत्रितपणे वाचाव्यात, असा कवी निर्देश करतो. मराठी गझलेत ही पद्धत राबवायची असल्यास मला कलम हा शब्द किंवा क हे अक्षर मला प्रस्तुत वाटते. कलम ह्या शब्दाचा एक अर्थ तुकडा करणे किंवा पाडणे. आणि दुसरा अर्थ ग्राफ्टिंग असाही आहे. (ह्याबाबतीत मार्गदर्शन केल्याबद्दल मी उर्दू-फारशीचे माझे जाणकार मित्र श्री. राजेंद्र जोशी ह्यांचा अत्यंत आभारी आहे. )

गझल: 

प्रतिसाद

माझ्या शंकेचे एका जाणकारांनी समाधान केल्याने इथला प्रतिसाद संपादित केला आहे.

सुंदर गझल..... आणि दिलखेचक मुक्तक.

डॉ.कैलास

अत्युत्तम गझल...

सगळेच शेर `एक से बढकर एक`. `गल्लाभरू` तर अप्रतिमच.
नवनव्या प्रतिमांच्या अशा कसदार गझला मराठीत अधिकाधिक प्रमाणात लिहिल्या जायला हव्यात.

या गझलेचे फुलपाखरू आता मेंदूत हिंडत राहील आज... !

`कलम` ही नवी पद्धतही या गझलेच्या निमित्ताने कळली. तुमचे आणि जोशीसाहेबांचे मनापासून आभार.

मतला,
मक्ता
आणि
नक्षीदार शाल

खूप छान वाटले. गझल छानच!

कलम
बाबत मला वयक्तिक आणखी स्पष्टीकरणाची गरज वाटते.

खलास

प्रतिसाद द्यायचा झाला तर अख्खी गझल कॉपी पेस्ट करावी लागेल

मिठी नेसू!!! काय भन्नाट कल्पना आहे!! चित्त... नेहमी प्रमाणे अत्युत्कृष्ट गझल!! आता तारीफ करताना सुद्धा काय लिहावे ह्यावर विचार करावा लागतो! आमच्या प्रतिसादांमधे तरी वेगळे पणा येवो! गझलेत राहुदे!

जबरदस्त गझल!! वाव्वा!!!

मतला, वासरू, माथेफिरू ?
गल्लाभरू, आणि विस्मरू खुप आवडलेत.

नेहमी प्रमाणे अत्युत्कृष्ट गझल!! आता तारीफ करताना सुद्धा काय लिहावे ह्यावर विचार करावा लागतो! आमच्या प्रतिसादांमधे तरी वेगळे पणा येवो! गझलेत राहुदे!

बहर यांच्या या मताशी १०१% सहमत! अतुलनीय कल्पना!

पहिले दोन सर्वाधिक आवडले... फारच सुंदर...

गायही तेव्हाच पान्हा सोडते
लागते जेव्हा लुचाया वासरू
क्षमा!! पण हा बहुधा मला कळलाच नाही.... मला फक्त त्यातला अत्यंत सरळ अर्थ दिसला..

चित्तरंजन,
अप्रतिम गझल.. एक से बढकर एक शेर!!
(वाचक)अनिरुद्ध अभ्यंकर

चित्तरंजनजी,
गझल खरेच आवडली.अधिक काही लिहीत नाही.वर सार्‍यांनी जे लिहिले तेही नसे थोडके.

'कलम'विषयी आणखी जाणण्याची इच्छा आहे.आपल्याला जमल्यास अधिक माहिती द्यावी.

@बहर...प्रतिसादामधे वेगळेपणा यावा हे ठीक.पण प्रतिसादाची भाषा जुनी असली(शब्द तेच असले )तरी येणारा प्रत्येक प्रतिसाद हा शेवटी नवाच असतो (आणि तो हवाही असतो)हे माझे वैयक्तिक मत.

खुळखुळाया लागले अश्रू किती !
केवढे लिहितोस तू गल्लाभरू

शेर आवडला. गझलही आवडली.
फक्त....
कोणत्या चिमटीत मी त्याला धरू ???????????

स्पष्टीकरण मिळले तर आनंद होईल.

चित्तरंजन जी,
सुंदरच आहे आपली गजल!
विशेषत्वाने आवडलेले शेर पहिले दोन आणि अखेरचा. 'वाताहत' किती सुंदर आलं आहे आणि 'सुगंधी सल' ही.
कवीच्या मेंदूत बगीचा फुलला आहे म्हणून तर फुलपाखरु तिथं हिंडतंय असं वाटलं आणि त्या अनुषंगानं गमतीने मनात आलं की -
बाग जर फुलला असे मेंदूमधे,
बागडू द्या, का धरा ते पाखरू

'कलम' बद्दल वाचून अधिक कळावं अशी उत्सुकता वाटली. वरही काहींनी सुचवलं आहेच, अधिक माहिती मिळावी.
-सतीश

क्लीन बोल्ड!
नवा प्रयोग ठरणारी ही मराठी गझल प्रचंड आवडली.
मराठी गझलेत एक नवे दालन उघडत आहे अशी जाणीव झाली.
-कलम-
'कलम'कारीने मुळातच मुलायम पोताच्या जमिनीवर सुंदर नक्षी उमटली आहे.
श्री. राजेंद्र जोशी यांचेही आम्ही वाचक ऋणी राहू.

कोणत्या चिमटीत मी त्याला धरू
हिंडते मेंदूत जे फुलपाखरू

साठवू इतके सुगंधी सल कुठे ?
आठवू कोणास, कोणा विस्मरू ?
वा गझल आवडली....

अप्रतिम... बस मार डाला!!!!!
एक राधा भावेंची ओळ आठवली फुलपाखरावरून
दु:खालाही चिमटीमध्ये धरता येते
आणिक त्याचे फुलपाखरू करता येते

अप्रतिम... बस मार डाला!!!!!
एक राधा भावेंची ओळ आठवली फुलपाखरावरून
दु:खालाही चिमटीमध्ये धरता येते
आणिक त्याचे फुलपाखरू करता येते

कलम या प्रकाराबद्दल बाकिच्यांशी सहमत. `नवे लेख' अथवा `गझलचर्चा' मधे या बद्दल सविस्तर वाचायला मिळाले तर आवडेल

सर्व प्रतिसादकांचा मनापासून आभारी आहे. ह. बा. , सतीश, विसुनाना आणि प्रसाद लिमये अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करीनच. क़ता/क़ता/मुक्तक गझलेपासून वेगळे करण्यासाठी ही मांडणीचा असते. विशेष काही नाही. हा नवा साहित्यप्रकार नाही.

वा वा! फुलपाखरू आणि पुढील शेर जास्त आवडले.

पापण्यांनी चित्र आहे रेखले
रंग कुठले सांग ओठांनी भरू ?

ओठ, डोळे, केस, बाहू, हनुवटी
(हे करू की ते करू की ते करू)

खुळखुळाया लागले अश्रू किती !
केवढे लिहितोस तू गल्लाभरू

साठवू इतके सुगंधी सल कुठे ?
आठवू कोणास, कोणा विस्मरू ?

तू अता बघशील वाताहत खरी
लागले पाणी पुराचे ओसरू

हा शेर सर्वाधिक आवडला.

साठवू इतके सुगंधी सल कुठे ?
आठवू कोणास, कोणा विस्मरू ?

सुरेख.
मुक्तकही सुंदर आहे.

एकूण गझल मस्त जमली आहे.

वा! सुंदर झालेय गझल!!!
गायही तेव्हाच पान्हा सोडते
लागते जेव्हा लुचाया वासरू
आवडली!

बढिया!
गल्लाभरू खास.

अप्रतिम गझल.
दिलेल्या अवीट आनंदाबद्द्ल आभार.

[ संपादित. इतरांच्या प्रतिसादांवर अकारण, अनावश्यक टीका-टिप्पणी करू नये. ]

मला ही गझल एकंदर टीकात्मक वाटली. तसेही, मराठी गझलेला 'केवळ टीका' हे नवीन नाही. बाकी म्हणाल तर एक साधीसुधी गझल.
तू अता बघशील वाताहत खरी
लागले पाणी पुराचे ओसरू

ह्या शेरातील विचार सुंदर. शेरही चांगला जमला आहे.
बाकी गायीचा वर्णनात्मक शेरही छान.

ता.क.
तुम्ही प्रतिसादांवर अवलंबून नाही हे माहीत आहेच.

धन्यवाद!

वा ! चित्तरंजन वा ! आवडली...
खूप आवडली गझल.

वा वा! पंत, वा वा!!

कोणत्या चिमटीत मी त्याला धरू
हिंडते मेंदूत जे फुलपाखरू

वा!

तू अता बघशील वाताहत खरी
लागले पाणी पुराचे ओसरू

अगदी खरे!

गायही तेव्हाच पान्हा सोडते
लागते जेव्हा लुचाया वासरू

वात्सल्यपूर्ण. वा!

खुळखुळाया लागले अश्रू किती !
केवढे लिहितोस तू गल्लाभरू

अहाहा :-) हा खास आपला शेर!

ओठ, डोळे, केस, बाहू, हनुवटी
(हे करू की ते करू की ते करू)

वा वा वा! शृंगाराची लयलूट आहे! फार फार आवडला!

आपला
(नतमस्तक) प्रवासी

गझल आवडली!

(खरं तर) आज पुन्हा नीट वाचली.

तू अता बघशील वाताहत खरी
लागले पाणी पुराचे ओसरू

या शेरातील लहजा खुप आवडला.

अ रे !
काय लिहिलस यार!
हे वाचू ,की ते वाचू ,की ते वाचू???

चित्तरंजन,

आपण जी माहिती दिली आहेत ती वाचून मला असे वाटले की:

खूप नक्षीदार आहे शाल पण
एकमेकांनाच आता पांघरू
आपल्या दोघांमधे कोणी नको
ये मिठी नेसू, तिची वस्त्रे करू

पापण्यांनी चित्र आहे रेखले
रंग कुठले सांग ओठांनी भरू ?
ओठ, डोळे, केस, बाहू, हनुवटी
(हे करू की ते करू की ते करू)

या चार चार ओळी अशा वाचायला हव्यात. दोन दोन ओळींमधे स्पेसही नको असे वाटले.

तसेच, असेही वाटले की 'कलम' ने वेगळ्या केलेल्या मुक्तकांच्या चार ओळी पूर्ण वाचल्याशिवाय त्यातून अर्थ निष्पन्न होऊ नये. हे योग्य / अयोग्य कृपया कळावे. (वरील मुक्तकांमधील दोन दोन ओळी वाचल्या तरी त्या पूर्ण वाटत आहेत असे वाटते.)

( शिवाय - याची गझलकाराला गरज का भासावी तेही सांगावेत अशी विनंती! काही मुद्यांचा आशय चार ओळींपेक्षा कमी ओळींत व्यक्त होत नाही म्हणून असावे काय? तसे असल्यास दोन यमके येणे आवश्यक आहे का? फक्त शेवटच्या ओळीत यमक आले तर चालेल का?)

गझल मस्तच! पहिले तीन शेर फारच सुंदर आहेत. आपले अभिनंदन!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

खूप नक्षीदार आहे शाल पण
एकमेकांनाच आता पांघरू
आपल्या दोघांमधे कोणी नको
ये मिठी नेसू, तिची वस्त्रे करू

पापण्यांनी चित्र आहे रेखले
रंग कुठले सांग ओठांनी भरू ?
ओठ, डोळे, केस, बाहू, हनुवटी
(हे करू की ते करू की ते करू)

या चार चार ओळी अशा वाचायला हव्यात. दोन दोन ओळींमधे स्पेसही नको असे वाटले.

नाही. स्पेस हवीच. साधारणपणे गझलेच्या सुरवातीला येणाऱ्या चार ओळींची मुक्तकांसारखी ही मुक्तके नाहीत. फक्त हे शेर उर्वरित गझलेपासून वेगळे वाचावेत एवढेच त्यात सांगणे आहे. उर्दूत असे शेर वेगळे करण्यापूर्वी त्यावर काफ़ हे लिहिण्याची पद्धत आहे.

तसेच, असेही वाटले की 'कलम' ने वेगळ्या केलेल्या मुक्तकांच्या चार ओळी पूर्ण वाचल्याशिवाय त्यातून अर्थ निष्पन्न होऊ नये. हे योग्य / अयोग्य कृपया कळावे. (वरील मुक्तकांमधील दोन दोन ओळी वाचल्या तरी त्या पूर्ण वाटत आहेत असे वाटते.)

प्रत्येक शेर स्वतंत्रपणे वाचावा.